
सावंतवाडी दि.११:
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत वीस दुकान गाळ्यांच्या भिंतींबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. संबंधित वीस दुकान गाळ्यांच्या भिंती काढण्यात आलेल्या आहेत. त्यावर बोलताना संजू परब यांनी “तुमच्यात दम असेल तर भिंती घालून दाखवा,” असे आव्हान दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, त्यांनाच त्या गाळ्यांच्या भिंती पुन्हा बांधण्याची इच्छा नाही. मात्र, या विषयावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची पत्रकार परिषद म्हणजे अशिक्षितपणाचा कहर आहे, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांनी केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना मांजरेकर म्हणाले की, संबंधित इमारतीचे २५ वर्षांपूर्वीच ऑडिट झाले असून, या इमारतीला कोणताही धोका नसल्याची पूर्ण माहिती संजू परब यांना होती. त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषदेत वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली होती. असे असताना नगरपरिषदेच्या मासिक बैठकीमध्ये वीस दुकान गाळ्यांच्या भिंतींचा विषय नेमका कशासाठी उपस्थित करण्यात आला? असा सवाल त्यांनी विचारला. दुकान गाळ्यांच्या भिंती पुन्हा बांधण्याचा विषय संजू परब यांच्या मनात कधीच नव्हता, त्यामुळे या विषयाचे भांडवल करून जनतेमध्ये गैरसमज पसरवू नयेत, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
शेवटी ॲड. भांबुरे यांना सल्ला देताना परीक्षित मांजरेकर म्हणाले की, अर्धवट माहितीच्या आधारे चिखलफेक आणि आरोप करण्यापेक्षा आधी संपूर्ण वस्तुस्थिती समजून घ्या आणि मगच माध्यमांसमोर बोला. अशा प्रकारची बिनबुडाची व अपुऱ्या माहितीवर आधारित वक्तव्ये आपल्यासारख्या जबाबदार व्यक्तीला मुळीच शोभत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.


