मालवण दि. १० :
शतकानुशतकांच्या श्रद्धेचा वारसा आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या भक्तिभावाची परंपरा राखत मालवणचे आराध्य दैवत श्री देव रामेश्वर महाराज आणि श्री देव नारायण महाराज यांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्याला मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी अत्यंत दिमाखात व उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. सोहळ्याच्या प्रारंभीच ‘श्री देव रामेश्वर महाराज की जय’ आणि ‘श्री देव नारायण महाराज की जय’ या जयघोषाने अवघा मालवणचा आसमंत दुमदुमून गेला असून भक्तीच्या या महासोहळ्याने संपूर्ण नगरी चैतन्यमय झाली आहे.
मालवणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा सोहळा केवळ देवदर्शनाचा उत्सव नसून मालवणच्या सामूहिक श्रद्धेचे, सांस्कृतिक अस्मितेचे व ऐतिहासिक परंपरेचे जिवंत प्रतीक मानला जातो. काळ बदलला आणि रोजगाराच्या निमित्ताने मालवणची माणसे देश-परदेशात विखुरली, तरीही ग्रामदैवतांवरील त्यांची निष्ठा व भक्तीचा धागा आजही तितकाच घट्ट असल्याचे चित्र या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
या मंगलपर्वासाठी मालवणसह संपूर्ण पंचक्रोशीतून हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे. गावोगावचे चाकरमानी, माहेरवाशिणी आणि नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईसह विविध शहरांत स्थायिक झालेले मालवणवासीय ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी आवर्जून आपल्या मूळ गावी परतले आहेत. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे मालवणच्या प्रमुख रस्त्यांना यात्रेचे मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पारंपरिक वाद्यांचा गजर, जयघोषाने भारलेले वातावरण आणि पालखीच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबलचक रांगांमुळे मालवणचे धार्मिक वैभव खुलून आले आहे. ग्रामदैवतांच्या चरणी माथा टेकवून भाविक आपापल्या कुटुंबाच्या सुखाची, समृद्धीची आणि आरोग्याची प्रार्थना करत आहेत. देव आणि भक्त यांच्यातील अनोखे नाते अधोरेखित करणारा आणि सर्वांना भक्तीच्या एका धाग्यात गुंफणारा हा सोहळा मालवणच्या सांस्कृतिक वैभवाचा अनुपम आविष्कार ठरत आहे.


