सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारत भूमिपूजन निमंत्रण पत्रिकेतून प्रोटोकॉल डावलल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी; उद्याच्या कार्यक्रमात याचे पडसाद उमटणार

सावंतवाडी दि.२०: सावंतवाडी पंचायत समितीच्या १४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून स्थानिक आमदारांना प्रोटोकॉलनुसार स्थान न दिल्याचा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रिकेवरून उद्या होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता शिवसेनेच्या गोटातून वर्तवण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शनिवारी दुपारी तीन वाजता या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाने निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली आहे. या पत्रिकेत राजशिष्टाचाराचा (प्रोटोकॉल) भंग झाल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पदाधिकाऱ्यांच्या मते, निमंत्रण पत्रिकेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नावानंतर स्थानिक आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. तसेच, त्यापाठोपाठ कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांचे नाव येणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने विधान परिषद सदस्यांची नावे आधी छापून विधानसभा सदस्यांची नावे त्यानंतर प्रसिद्ध केली आहेत.
दरम्यान, सावंतवाडी पंचायत समितीच्या या १४ कोटी रुपयांच्या इमारतीसाठी स्थानिक आमदार म्हणून दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळात असताना विशेष प्रयत्न करून निधी मंजूर करून आणला होता, अशी माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. असे असतानाही प्रत्यक्ष भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉल डावलून शिवसेनेच्या दोन्ही आमदारांना दुय्यम स्थान दिल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, उद्याच्या कार्यक्रमात याचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here