दोडामार्ग बाजारपेठेत पहाटे कारची काच फोडली; पत्नीच्या वादातून घडला प्रकार, दोडामार्ग पोलिसांची तडकाफडकी कारवाई

दोडामार्ग, दि. १०:
दोडामार्ग बाजारपेठेत मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका परप्रांतीय तरुणाने कौटुंबिक वादातून हॉटेल मालकाच्या कारची काच फोडल्याची घटना घडली. मात्र, दोडामार्ग पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या दोन तासांत संशयित तरुणाला ताब्यात घेतले. या प्रकरणी मालकाने नुकसानभरपाईची जबाबदारी घेतल्याने पुढील समझोता झाला आहे, तर पत्नीने मारहाणीबाबत पोलिसांत धाव घेतल्याने कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

काय आहे नेमकी घटना?

दोडामार्ग येथे वास्तव्यास असलेला एक उत्तर प्रदेशातील परप्रांतीय तरुण मंगळवारी पहाटे आपल्या पत्नीसोबत भांडण करून थेट बाजारपेठेत आला. येथील हॉटेल मालक प्रशांत नाईक (केरकर) यांनी आपली कार नेहमीप्रमाणे दुकानासमोर उभी केली होती. याच संतापलेल्या तरुणाने लाकडाची रिप घेऊन कारची दर्शनी (फ्रंट) काच फोडली. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.

सकाळी प्रकार लक्षात येताच प्रशांत नाईक यांनी तात्काळ दोडामार्ग पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.

पोलिसांची धडाकेबाज कारवाई आणि संशयित ताब्यात

घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने सूत्रे हलवली. आश्चर्य म्हणजे, याच दरम्यान ती परप्रांतीय महिला आपल्या पतीविरुद्ध मारहाणीची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तिचा पती “मी काच फोडली” असे बोलत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या धाग्यापकडीवरून पोलिसांनी अवघ्या दोन तासांत संशयित तरुणाला बेड्या ठोकल्या आणि पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान त्याने पत्नीसोबतच्या वादातून हा प्रकार केल्याची कबुली दिली.

नुकसानभरपाईची जबाबदारी आणि समझोता

संशयित तरुण ज्याठिकाणी कामाला आहे, त्या मालकाने पुढे येत कारच्या नुकसानीची पूर्ण भरपाई देण्याची जबाबदारी स्वीकारली. यामुळे कारचे नुकसान भरून मिळणार असल्याने पुढील वाद मिटला आणि पोलिसांनी तरुणाला कडक समज दिली.

मात्र, कौटुंबिक हिंसाचार व मारहाणीच्या तक्रारीसाठी ती महिला आपल्या लहान मुलासह पोलीस ठाण्यात हजर असल्याने त्या अनुषंगाने पोलिसांची कारवाई सुरू आहे. दोडामार्ग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि अवघ्या दोन तासांत आरोपीला जेरबंद केल्याबद्दल हॉटेल मालक प्रशांत नाईक यांनी पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here