
कुडाळ दि:०३: “सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले असून, या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, पर्यटनाला गती आणि लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू,” असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कुडाळ येथे आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या महायुती प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार निलेश राणे, रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजू परब, दत्ता सामंत, आणि महायुतीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
विजयाचा श्रीगणेशा: महायुतीचे २५ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ही विजयाची नांदी असून जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता १०० टक्के येईल, असा दावा शिंदे यांनी केला.
विकासाचा ‘स्पीड ब्रेकर’ काढला: “मी मुख्यमंत्री असताना कामांना स्थगिती देण्याचे राजकारण न करता विकासाचा वेग वाढवला. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
लाडकी बहीण योजना: विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, ही योजना केवळ सुरूच राहणार नाही, तर आता ती २१०० रुपये करण्याची घोषणा आम्ही पूर्ण करू. केवळ पैसे देऊन न थांबता, महिलांना स्वतःचे व्यवसाय करण्यासाठी बळ देऊन त्यांना ‘उद्योजिका’ बनवण्याचे आमचे स्वप्न आहे.
स्थानिक रोजगार व पर्यटन: जिल्ह्यातील तरुणांचे मुंबई-ठाण्याकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी जिल्ह्यात ‘स्किल सेंटर’ उभारले जातील. तसेच नारळ आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक असून पर्यटनातून रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल.
महायुतीची वज्रमुठ
खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची भक्कम युती झाली आहे. विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, उद्योगमंत्री उदय सामंत आणि नितेश राणे यांनीही आपल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
कुडाळ येथे मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार निलेश राणे, रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजू परब दत्ता सामंत आदी


