इंग्रजी माध्यमाच्या अंगणातही मायबोलीचा जागर; सावंतवाडीत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात

सावंतवाडी दि.२७ : मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली जननी आहे. आजच्या इंग्रजी माध्यमाच्या युगातही लहान मुलांनी ज्या आत्मीयतेने मराठीचा गौरव केला, ते पाहून मराठीची मुळे खोलवर रुजलेली आहेत याची खात्री पटते, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी केले.

कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त, कोकण मराठी साहित्य परिषद (शाखा सावंतवाडी) आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

मराठी टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना मसके पुढे म्हणाले की, “परदेशात मराठी जपण्यासाठी विशेष प्रयत्न होत असताना, आपण मात्र आपल्याच बोलीतील शब्द विसरत चाललो आहोत. ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांची समृद्ध भाषा आहे. बंद होणाऱ्या मराठी शाळांचे प्रमाण घटवण्यासाठी आणि ही भाषा टिकवण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक मेहनत घेणे काळाची गरज आहे.”

साहित्यिकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा उत्साह
या सोहळ्याचे औचित्य साधून दोन विशेष सत्कार करण्यात आले:

ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रुजूल पाटणकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.मराठी विषयातील विविध स्पर्धांत यश मिळवलेली विद्यार्थिनी मनवा साळगावकर हिचेही कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दादा मडकईकर यांच्या कविता सादरीकरणाने झाली. त्यानंतर, पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज, केशवसुत, वि. स. खांडेकर, आरती प्रभू, शांता शेळके, मधू मंगेश कर्णिक आणि शिवाजी सावंत यांसारख्या दिग्गज साहित्यिकांच्या जीवनावर प्रकाश टाकला. चिमुकल्यांच्या काव्यवाचनाने उपस्थित श्रोते भारावून गेले होते.

हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस
‘कोमसाप’ सावंतवाडीचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर यांनी सांगितले की, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना आपल्या मायबोलीतून संवाद साधता यावा आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश होता. मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

उपस्थित मान्यवर या प्रसंगी कोमसाप जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, राजू तावडे, अभिमन्यू लोंढे, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. सुभाष गोवेकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, चैताली वेर्लेकर यांसह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनानाथ वारंग यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी मानले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here