काजू हंगाम धोक्यात आल्याने कोलझर पंचक्रोशीतील शेतकरी आक्रमक; सावंतवाडी वनविभागाला निर्वाणीचा इशारा
सावंतवाडी दि.०४: “काजू उत्पन्नावर आमच्या शेकडो कुटुंबांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून आहे. आता हक्काच्या हंगामातच हत्तींनी बागांमध्ये ठाण मांडल्याने काजू झाडाखाली सडून जात आहे. वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या चार दिवसांत हत्तींना हटवले नाही, तर वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठाण मांडून उपोषण करू,” असा संतप्त इशारा कोलझर-तळकट दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिला आहे.
सध्या कोलझर भागात हत्तींच्या कळपाने मुक्काम ठोकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज संतप्त शेतकऱ्यांनी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. उपवनसंरक्षक मिनीश शर्मा रजेवर असल्याने सहाय्यक उपवनसंरक्षक वैभव बोराटे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.
‘वनतारा’च्या प्रयोगाचा फटका
गेल्या वर्षी हत्तींच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी ‘वनतारा’ प्राणी संग्रहालयाचे तज्ज्ञ आले होते. त्यावेळी हत्तींना परिसरातून हटवू नका, अशी अजब भूमिका वनविभागाने घेतली होती. या प्रयोगामुळे हत्ती या भागात स्थिरावले आणि त्यांनी नारळ, सुपारी व काजू बागांचे कोट्यवधींचे नुकसान केले. वनविभागाचा हा ‘खेळ’ शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारा ठरल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.
जीवितहानी झाल्यास वनविभाग जबाबदार
शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, बहुतांश बागा डोंगराळ भागात आहेत. तिथे हत्तींचा वावर असल्याने शेतकरी बागेत जायला घाबरत आहेत. पोटासाठी जिवावर उदार होऊन बागेत गेल्यावर जर काही जीवितहानी झाली, तर त्याला सर्वस्वी वनविभाग जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
तात्काळ मोहीम: हत्तींना तातडीने परिसरातून हुसकावून लावणे.
अतिरिक्त यंत्रणा: गस्तीसाठी तातडीने किमान दोन अतिरिक्त ड्रोन उपलब्ध करून देणे.
सौर कुंपण: हत्तींचा शिरकाव रोखण्यासाठी ‘केर’ ते ‘कोलझर’ मार्गावर सौर ऊर्जेवर चालणारे हँगिंग कुंपण उभारणे.
नुकसान भरपाई: नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी स्वतंत्र आणि कार्यक्षम यंत्रणा राबवून त्वरित भरपाई देणे.
वनविभागाचे आश्वासन
सहाय्यक उपवनसंरक्षक वैभव बोराटे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. हत्तींना हटवण्याची कार्यवाही आज संध्याकाळपासूनच सुरू केली जाईल आणि पुढील १० दिवसांत काजू नुकसानीचा पंचनामा करून अहवाल शासनाकडे पाठवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, सरपंच सुजल गवस, शामराव देसाई, आपा देसाई, महादेव देसाई, रोहन देसाई, दिलीप देसाई यांच्यासह कोलझर पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



काजू हंगाम धोक्यात आल्याने कोलझर पंचक्रोशीतील शेतकरी आक्रमक; सावंतवाडी वनविभागाला निर्वाणीचा इशारा