माजगाव सरपंच पोटनिवडणुकीत ४० टक्के मतदान; महायुती विरुद्ध अपक्ष लढतीचा निकाल बुधवारी

सावंतवाडी दि.२८: तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी मंगळवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी अत्यंत थंड प्रतिसाद दिला. वाढत्या उष्णतेचा परिणाम मतदानावर दिसून आला असून, दिवसभरात केवळ ४०.११ टक्के मतदान झाले आहे. महायुती विरुद्ध अपक्ष अशा या दुरंगी आणि अटीतटीच्या लढतीचा निकाल बुधवारी सकाळी १० वाजता सावंतवाडी तहसील कार्यालयात स्पष्ट होईल.

माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी भाजपा महायुती पुरस्कृत रंजना रवींद्र कानसे आणि अपक्ष जयश्री दिनेश सावंत यांच्यात थेट लढत होत आहे. माजी सरपंच दिनेश सावंत यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, मात्र दिवसभर मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. एकूण ४,१८५ मतदारांपैकी केवळ १,६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ८९७ पुरुष तर ७८२ महिला मतदारांचा समावेश आहे.

प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी:प्रभाग १ मध्ये ५११ (एकूण १००१), प्रभाग २ मध्ये ३५० (एकूण ७३८), प्रभाग ३ मध्ये १९३ (एकूण ८७०), प्रभाग ४ मध्ये ३१३ (एकूण ८३१) तर प्रभाग ५ मध्ये ३१२ (एकूण ७४५) मतदारांनी मतदान केले. प्रभाग ३ मध्ये सर्वात कमी प्रतिसाद पाहायला मिळाला. दुपारनंतर उष्णता कमी झाल्यावर गर्दी वाढेल ही अपेक्षा देखील फोल ठरली.

दरम्यान, नाणोस ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठीही मतदान पार पडले. या ठिकाणी १५४ पैकी ८७ मतदारांनी हक्क बजावला असून ५६.४९ टक्के मतदान झाले आहे. माजगावच्या तुलनेत नाणोसमध्ये मतदानाची टक्केवारी समाधानकारक राहिली.

दोन्ही उमेदवारांनी गेल्या आठ दिवसांत जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. आता या कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार आणि माजगावचा नवा सरपंच कोण होणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषी अधिकारी यशवंत परब काम पाहत आहेत. मते कमी असल्याने मतमोजणी सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात निकाल स्पष्ट होईल, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here