— हरिश्चंद्र चंद्रकांत पवार ( विजय )
आईच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्या मायेची सावली हरपल्याचे दुःख अजून मनात ताजे असतानाच पहाडासारखा पाठीशी उभा राहणारा बाबा अचानक निघून गेला आणि आयुष्यच पोरके झाले. आईचा समजूतदारपणा आणि बाबांचा कणखरपणा यामुळे आमचे आयुष्य फुलत होते. आई गेल्यानंतर मोठा आधार हरपला होता, पण बाबांच्या रूपाने आम्हाला अजूनही धीर होता. मात्र नियतीने तोही आधार हिरावून घेतला.
आई-बाबांची जोडी खरोखर अद्भुत होती. दोघेही एकत्र जात, कधी भांडत, तर दुसऱ्याच क्षणी पुन्हा एकमेकांत मिसळून जात. आई गेल्यानंतर बाबांची जगण्याची इच्छाच कमी झाली होती. जेवणावरची वासना उडाली होती. सतत तिच्याच आठवणीत ते हरवून जात. “आता तिच्याशिवाय माझे काय होणार?” हा प्रश्न त्यांना सतावत असे.
आम्ही भावंडे त्यांना समजावून सांगत होतो. आईला वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न झाले, पण दैवापुढे कुणाचे काही चालत नाही. आम्ही त्यांना सांगत असू, “आता तुम्हीच आमचे आई-बाबा आहात. तुम्ही खचू नका. सैन्यात सेवा करताना शत्रूच्या गोळ्यांना सामोरे गेलात, आता नशिबाशीही सामना करा.” पण आईच्या विरहाने त्यांचे मन तुटले होते. अखेर अवघ्या महिन्याभरात आईने जणू त्यांनाही आपल्या सोबत बोलावून घेतले. आता “विजय” अशी हाक कोण मारणार?
बाबा स्वभावाने रागीट होते, पण परिस्थितीने त्यांना तसे घडवले होते. एक सैनिक म्हणून त्यांनी कठोर शिस्त अंगीकारली होती. त्यांचे हृदय जरी कठोर वाटत असले, तरी मुलांबद्दलची माया अथांग होती. मनाला जे पटत नाही ते त्यांनी कधी स्वीकारले नाही. सैनिकी शिस्त, बोलण्यातला दरारा आणि देशसेवेचा अभिमान त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येत असे.
१९६५ आणि १९७१ च्या युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आम्ही लहान असताना त्यांनी जम्मू-काश्मीर आणि बिहारमधील गया येथे आम्हाला सोबत नेले होते. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फात खेळण्याचे दिवस आजही डोळ्यांसमोर उभे राहतात. परेड मैदानावरून येणारा “एक-दोन, एक-दोन” चा आवाज, सैनिकांच्या बुटांचा खडखडाट, आणि सैनिकी वातावरणातील शिस्त आजही स्मरणात आहे.
बाबा शक्तिमान गाडीतून आम्हाला फिरायला नेत असत. लंगरमध्ये नेऊन रोटी, डाळ, भाजी, टॉफी खाऊ घालत असत. अनेकदा कोंबड्या, अंडी आणि इतर सामान घेऊन येत असत. काश्मीरमधील बर्फ, मीठाचा चहा आणि आईची काळजी आजही मनात कोरलेली आहे. आम्ही तिची नजर चुकवून बर्फात खेळत असू आणि मग आजारी पडलो की तिची बोलणीही खावी लागत.
आईनंतर बाबा आमचे सर्वस्व होते. त्यांचे जाणे म्हणजे आमच्या कुटुंबावर आभाळ कोसळण्यासारखे होते. त्यांनी कधी कुणाकडे काही मागितले नाही. स्वाभिमानाने जगले. निवृत्ती वेतन, सैनिकी सुविधा आणि देशसेवेचा अभिमान हेच त्यांचे खरे वैभव होते.
प्रत्येक २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला ते सैनिकासारखेच सजून ध्वजारोहणाला जात असत. बुटांना पॉलिश, बेल्ट चमकवून आणि स्टार्च केलेला गणवेश परिधान करून ते अभिमानाने सहभागी होत. अनेकदा त्यांना ध्वजारोहणाचा मान मिळत असे आणि तो क्षण ते मोठ्या आनंदाने सांगत असत.
१९७१ च्या युद्धाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडीतील रॅलीत त्यांनी गणवेश परिधान करून सहभाग घेतला होता. त्यांच्यातील देशभक्ती आणि राष्ट्रसेवेचा अभिमान शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिला.
आमच्या घराण्यात देशसेवेची परंपरा आजोबांपासून चालत आलेली आहे. आजोबा मराठा बटालियनमध्ये होते. बाबा एएससीमध्ये सेवा बजावत होते. शांताराम आबा, बाबू काका आणि इतर नातेवाईकांनीही सैन्यदलात सेवा बजावली. आज त्यांपैकी बहुतेक जण या जगात नाहीत. मात्र त्यांची देशसेवा, त्याग आणि शिस्तीची परंपरा आमच्या मनात कायम जिवंत आहे.
आई, तू गेलीस आणि जाताना बाबांनाही सोबत घेऊन गेलीस. आम्ही कुणाच्या आधारावर जगायचे गं? बाबा, तुमचे जाणे आम्हाला पोरके करून गेले. तुमच्या आणि आईच्या आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील. तुमचे जीवन, तुमचा त्याग, तुमची देशभक्ती आणि तुमचे संस्कार आमच्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील.
तुमची आठवण प्रत्येक क्षणी येते आणि येत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली!
/——–/——-/——/——-/*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-*अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
*वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी*
संपर्क :9422054887,8275659563


