जिल्हा परिषद निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनसचा ‘पाणी’ मुद्दा निर्णायक

रेल्वेच्या विकासाची चावी आता स्थानिक संस्थांच्या हाती

सावंतवाडी दि.०३: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न आता केवळ रेल्वे प्रशासनापुरता मर्यादित न राहता, तो आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या केंद्रस्थानी आला आहे. टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असल्याने, यंदाच्या निवडणुकीत ‘पाणी’ हाच कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रशासकीय पेच की राजकीय इच्छाशक्ती?

रेल्वे हा केंद्र सरकारचा विषय असला, तरी सावंतवाडी टर्मिनससाठी लागणाऱ्या पाण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. तिलारी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी सावंतवाडी पंचायत समितीने आराखडा तयार केला असून, तो जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या योजनेसाठी निधी मिळवणे आणि तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे ही सर्वस्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीची जबाबदारी आहे. त्यामुळे या संस्था किती सक्षमपणे काम करतात, यावरच टर्मिनसचे भवितव्य अवलंबून आहे.

केवळ रेल्वेच नव्हे, गावांसाठीही योजना महत्त्वाची

या पाणीपुरवठा योजनेचे महत्त्व केवळ रेल्वे प्रवाशांपुरते मर्यादित नाही. या योजनेमुळे परिसरातील तीन मुख्य गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.मळगाव,कुंभार्ली,ब्राह्मणपाट
या गावांतील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असल्याने, स्थानिक ग्रामस्थांमध्ये या मुद्द्यावरून मोठी संवेदनशीलता पाहायला मिळत आहे. नागरिक आता केवळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता, ठोस कृती करणाऱ्या उमेदवारालाच पसंती देण्याच्या तयारीत आहेत.

“रेल्वे प्रकल्प केंद्राचा असला, तरी पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे या योजनेचा पाठपुरावा आणि अंमलबजावणी ही स्थानिक लोकप्रतिनिधींचीच जबाबदारी आहे. पाणी सुटल्याशिवाय टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू होणे अशक्य आहे.” — सागर तळवडेकर, पदाधिकारी, कोकण रेल्वे प्रवासी समिती.

निवडणुकीत ‘वॉटर फॅक्टर’ ठरणार गेमचेंजर

येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मतदार उमेदवारांना या पाणी योजनेबाबत जाब विचारताना दिसत आहेत. मळगाव आणि आसपासच्या पट्ट्यात या विषयाचा सर्वाधिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या योजनेला गती देणारा लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा वाहक ठरेल, असा सूर मतदारांमधून उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here