सावंतवाडीतील बनावट नोटांचे धागेदोरे सांगलीपर्यंत; सहा संशयितांना अटक

सावंतवाडी दि.२८: शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत भरलेल्या रकमेत २०० रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सांगली येथील बनावट नोटांच्या कारखान्याशी असलेले कनेक्शन उघड केले आहे. याप्रकरणी सांगली कारागृहात असलेल्या सहा आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिकृतपणे अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बँकेच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड
शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत एका ग्राहकाने आपल्या खात्यात पैसे जमा केले होते. यावेळी कॅशियरच्या तपासणीत २०० रुपयांच्या आठ नोटा (एकूण १६०० रुपये) बनावट असल्याचे निदर्शनास आले. या नोटांबाबत ग्राहकाकडे चौकशी केली असता, चलनातून या नोटा आपल्याकडे आल्याचे त्याने सांगितले. बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

सांगली कनेक्शन आणि आरोपींची अटक
सावंतवाडीत जप्त केलेल्या बनावट नोटांचे सिरीयल नंबर आणि सांगलीतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील नोटांचे सिरीज नंबर एकच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सांगली पोलिसांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्या गुन्ह्यातील सहा आरोपी सध्या सांगली कारागृहात होते.

सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने न्यायालयातून परवानगी मिळवून या सहा संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पुढील संशयितांचा समावेश आहे:
सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२, कोल्हापूर)
राहुल राजाराम जाधव (वय ३३, कोल्हापूर)
इब्रार आदम इनामदार (वय ४४, कोल्हापूर)
नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, कोल्हापूर)
संदीप बाळू कांबळे (वय ३८, कोल्हापूर)
सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, मालाड, मुंबई) अशी नावे आहेत.

कोकण आणि गोवा पोलिसांच्या रडारवर
बनावट नोटांची व्याप्ती आता कोकण आणि गोवा राज्यापर्यंत पसरली असण्याची दाट शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. “सांगली-कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात या रॅकेटचे धागेदोरे आहेत. कोकणातही या नोटा वितरित झाल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज असून, नागरिकांनी अशा नोटा आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या अटकेमुळे बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here