सिंधुदुर्ग दि.०९: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शनिवारी सायंकाळी आचरा परिसराला सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. या वादळाचा मोठा तडाखा आचरा गावाला बसला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने घरे, दुकाने आणि वीज यंत्रणेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मोबाईल टॉवर कोसळला, वीज यंत्रणा कोलमडली
आचरा काझीवाडी येथील एका वाचनालयाच्या तीन मजली इमारतीवरील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर पूर्णतः उन्मळून खाली कोसळला. सुदैवाने हा टॉवर शेजारच्या घरावर न पडल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र यामुळे परिसरातील बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले आहे. तसेच, अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणचे कर्मचारी पाऊस आणि अंधारातही पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
घरांचे आणि दुकानांचे नुकसान
आचरा देवूळवाडी येथील मनीषा आयर यांच्या घरावर आंब्याची मोठी डहाळी पडल्याने घराचे नुकसान झाले, तर वरचीवाडी येथील विशाल कांबळे यांच्या घराचे लोखंडी पत्रे उडून गेल्याने घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. आचरा बंदर रोडवर माड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर आपल्या दुकानात अडकून पडल्या होत्या, त्यांना ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने झाड हटवून सुरक्षित बाहेर काढले.
बळीराजा आणि नागरिक हवालदिल
जिल्ह्यात सलग तीन दिवस सुरू असलेल्या या पावसामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. काढणीला आलेल्या आंब्याची मोठी गळती होत असल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. तसेच लग्नसराईचा हंगाम असल्याने विवाह सोहळ्यांमध्येही या पावसामुळे मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे.आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्तांना धीर दिला आहे. जिल्ह्यात नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


