सावंतवाडी दि.३०: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच सावंतवाडी शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वटसावित्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरात विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जड अंतःकरणाने आणि साश्रू नयनांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
श्रद्धांजली सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या प्रशासकीय पकड आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले.अन्नपूर्णा कोरगावकर (माजी उपनगराध्यक्ष): “अजितदादांच्या जाण्याने पक्षाची आणि राज्याची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. एक खंबीर नेतृत्व आपण गमावले आहे.”
उमाकांत वारंग (विधानसभा अध्यक्ष): त्यांनी दादांच्या कामातील शिस्त आणि वेळेचे महत्त्व यावर भाष्य करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शफिक खान (राज्य सचिव, अल्पसंख्यांक विभाग) व रिद्धी परब (तालुका महिला अध्यक्ष): यांनी दादांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचा उल्लेख करत, त्यांनी सर्व घटकांना दिलेला न्याय याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच व्ही. जे. एन. टी. सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनीही दादांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
अजितदादांच्या निधनामुळे केवळ राजकीय कार्यकर्त्यांमध्येच नव्हे, तर सर्वसामान्यांमध्येही मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या शोकसभेला भार्गवदास शिरोडकर, श्याम बेकनाळकर, शिवहरी खराडे, निलेश माणगावकर, सतीश चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि सावंतवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून निघणारी नाही,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपले दुःख व्यक्त केले. संपूर्ण सावंतवाडी परिसरात आज या दुःखद घटनेमुळे शांतता पसरली होती.



