सावंतवाडी पाणीपुरवठा घोटाळा: फरार फिटर भारत लाखेच्या व्हिडिओ बॉम्बनंतर सभापती प्रतीक बांदेकर यांचा राजीनामा; नगरपालिकेची आजची सभा वादळी ठरणार

सावंतवाडी दि.०९: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील आर्थिक गैरव्यवहार आणि महत्त्वाचे रजिस्टर गहाळ प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला पालिकेचा जोडारी (फिटर) भारत लाखे याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत थेट पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर, न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशाराही त्याने दिला. या खळबळजनक प्रकारामुळे सावंतवाडीच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर अखेर सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज होणाऱ्या पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेपूर्वीच हा राजीनामा देण्यात आल्याने पालिकेची आजची सभा प्रचंड वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
सावंतवाडी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होते. त्यातच पालिकेकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून महत्त्वाचे रजिस्टर गहाळ केल्याप्रकरणी फिटर भारत लाखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या लाखेने अचानक थेट सोशल मीडियावरून व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओत त्याने थेट पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आणि आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला. या प्रकारानंतर तो पोलिसांत हजर झाला.
या खळबळजनक घडामोडींमुळे शहरात तर्कवितर्कांना उधाण आले असून पाणीपुरवठा विभागातील या गंभीर वादामुळे सावंतवाडीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या संपूर्ण प्रकाराचे तीव्र पडसाद आज होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आजच्या सभेत याप्रकरणी काय चर्चा होते आणि नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण सावंतवाडी नगरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here