माजगाव ग्रामपंचायतीतर्फे जि. प. सदस्य विक्रांत सावंत यांचा अभिनंदन पत्र देऊन सत्कार

​१५ व्या वित्त आयोगातून ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर; विकासाला नवी गती मिळण्याचा विश्वास

​सावंतवाडी दि.११:माजगाव (ता. सावंतवाडी) येथील नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत ४५ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. या महत्त्वपूर्ण विकासकामांचा पाठपुरावा करून निधी खेचून आणल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. विक्रांत विकासभाई सावंत यांचे माजगाव ग्रामसचिवालय व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
​यासंदर्भात माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम. रंजना रवींद्र कानसे यांनी अभिनंदन पत्र देऊन विक्रांत सावंत यांचे आभार मानले. पत्रात नमूद केल्यानुसार, लोकप्रतिनिधी म्हणून असलेली तळमळ, कार्यतत्परता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळेच एवढा मोठा निधी मंजूर करून आणणे शक्य झाले आहे. या विकासनिधीमुळे माजगाव गावाच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच नवीन गती मिळेल, असा विश्वासही ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.
​भविष्यातही विक्रांत सावंत यांच्या हातून अशीच लोकोपयोगी कामे सातत्याने घडत राहोत, अशा शुभेच्छा देऊन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here