सावंतवाडी दि.२३: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शहरात सुरू असलेल्या तब्बल ५७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेचा ‘थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट’ सावंतवाडी पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. पुणे येथील ‘सीओईपी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी’ने काम समाधानकारक असल्याचा अहवाल दिल्याने बंद पडलेल्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या जानेवारी २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी ऑडिट करणाऱ्या प्राध्यापकांच्या अनुपस्थितीवरून आणि अहवालातील त्रुटींवरून ही सभा चांगलीच गाजली.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मुख्याधिकारी विनायक औंधकर, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर (ऑनलाईन) यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
🔴 सभेत कशावरून उडाला गोंधळ?
तज्ज्ञांची अनुपस्थिती व अर्धवट अहवाल: १४ मुद्यांवर आधारित अहवाल देणारे सीओईपीचे प्रा. डॉ. नामदेव हेडाऊ अनुपस्थित राहिल्याने भाजप नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी आक्रमक होत, “तांत्रिक शंकांचे निरसन कोण करणार?” असा सवाल केला. अहवालातील काही पाने गायब असल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर आणि ॲड. सायली दुभाषी यांनीही कडाडून विरोध केला.
रस्त्यांची दुरवस्था: खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांचे अपघात होत असल्याने रस्ते दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी नगरसेविका वीणा जाधव, अजय गोंदावळे, नीलम नाईक, तौकीर शेख आणि आनंद नेवगी यांनी केली.
विशेष सभा पुन्हा घेण्याची मागणी: ऑनलाईन उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी तांत्रिक अडचणींमुळे संवाद ऐकू न आल्याचे सांगत, “अहवाल केवळ एप्रिलपर्यंतच्या कामाचाच आहे. जनतेची दिशाभूल चालली असून यावर लवकरच पत्रकार परिषद घेणार,” असा इशारा देत विशेष सभा पुन्हा घेण्याची मागणी केली.
💧 जानेवारीअखेर काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
या चर्चेला उत्तर देताना मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले की, “उर्वरित ५२ टक्के काम पूर्ण करण्यासाठी ६ विशेष टीम्सची नेमणूक करण्यात आली असून जानेवारी महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल. निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे प्राध्यापक उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र सदस्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल.”
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी “अनावश्यक चर्चा न करता काम वेळेत पूर्ण करून सावंतवाडीकरांना पाणी देण्यावर भर द्यावा,” अशी भूमिका मांडली. शेवटी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी रस्ते दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.



