सावंतवाडी दि.२६: ऑनलाइन गेमिंगसाठी घेतलेल्या कर्जाचा वाढता बोजा आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून सातार्डा-रायाचेपेड येथील एका दुर्दैवी मायलेकाने घरापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर असलेल्या तेरेखोल नदीपात्रात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. एकमेकांच्या हातांना दोरीने बांधलेल्या अवस्थेत या दोघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आल्याने सातार्डा परिसरात मोठी शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (वय ६३) आणि तुकाराम ऊर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (वय २७) अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत. आई आणि मुलगा दोघेच एकत्र राहत होते आणि त्यांच्या पश्चात जवळचे कोणीही नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकाच कुटुंबाचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत.
नदीकाठावरील वस्तूंतून उघडकीस आली घटना
शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेचा उलगडा रविवारी झाला. नदीपात्राच्या काठावर चप्पल आणि बॅटरी आढळून आल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी तातडीने शोधाशोध सुरू करून पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सातार्डा दूरक्षेत्राचे पोलीस नागनाथ टक्केकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
गोवा पोलीस आणि सावंतवाडी पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात शोधमोहीम राबवली. मात्र, मृतदेह पाण्याच्या आत असल्यामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्या. दुपारपर्यंत रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल न झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यास विलंब झाला.
स्थानिक ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश
पोलीस व प्रशासकीय यंत्रणेचे प्रयत्न सुरू असतानाच, स्थानिक ग्रामस्थ राऊळ यांनी ज्या ठिकाणी मायलेकांनी नदीत उडी घेतल्याचा संशय होता, त्या ठिकाणी गळ टाकून शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि दोन्ही मृतदेह गळाला लागले. विशेष म्हणजे, एकमेकांचे हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत असलेले हे मृतदेह रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.
यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या शोधकार्यात पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी प्रसंगी पोलीस पाटील विनिता मयेकर, सातोसेचे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये आणि सरपंच संदीप प्रभू यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्यात सहकार्य केले.
ऑनलाइन गेमिंगचे कर्ज ठरले तणावाचे कारण?
मृतक सुहास याने ऑनलाइन गेमिंगसाठी मोबाईलच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. कर्जाची ही रक्कम सतत वाढत गेल्यामुळे तो तीव्र आर्थिक तणावाखाली होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच नैराश्येतून आणि तणावातून या मायलेकाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, घटनेमागील नेमकी व सविस्तर कारणे पोलिसांच्या सखोल तपासातूनच समोर येणार आहेत.
आर्थिक विळख्याने हिरावले दोन जीव
आर्थिक अडचणींचा वाढता ताण, ऑनलाइन गेमिंग व व्यसनांच्या आहारी जाण्याचे भीषण धोके आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक घालमेल किती जीवघेणी ठरू शकते, याचे भीषण वास्तव या घटनेने पुन्हा एकदा समोर आणले आहे. कालपर्यंत आपल्या शेजारी हसतखेळत जगणारे मायलेक आज अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने सातार्डा-रायाचेपेड परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तींना वेळीच आधार मिळण्याची आणि अशा जीवघेण्या मार्गांपासून दूर राहण्यासाठी जनजागृतीची किती गरज आहे, हाच गंभीर प्रश्न या घटनेने निर्माण केला आहे.


