नरकासुर दहनावेळी झाडाला आग

 अग्निशमन बंब सर्व्हिसिंगला असल्याने वेंगुर्ल्यावरून मागवली मदत; सावंतवाडी पालिकेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप

सावंतवाडी येथील प्रांत कार्यालय परिसरात आज पहाटेच्या सुमारास नरकासुर दहनादरम्यान एका झाडाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आगीच्या वेळी सावंतवाडी नगरपालिकेचा स्वतःचा अग्निशमन बंब उपलब्ध नसल्याने आपत्कालीन व्यवस्थेचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे नरकासुराचे दहन सुरू असताना आगीच्या ठिणग्यांमुळे जवळच असलेल्या एका झाडाने पेट घेतला. नागरिकांनी तातडीने प्रसंगावधान राखत सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. मात्र, पालिकेचा अग्निशमन बंब सर्व्हिसिंगसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऐनवेळी बंब उपलब्ध नसल्यामुळे शेजारच्या वेंगुर्ला नगरपालिकेकडून अग्निशमन बंब मागवण्यात आला.

वेंगुर्ल्यावरून बंब दाखल होईपर्यंत स्थानिक नागरिकांनी एकत्र येत आग विझवण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने, आगीने रौद्र रूप धारण न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु, सावंतवाडी शहरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणाच हजर नसल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दिवाळीच्या सण-उत्सवाच्या काळात आणि शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेता आपत्कालीन यंत्रणा नेहमी सज्ज असणे अत्यंत गरजेचे आहे. तरीही अशा संवेदनशील प्रसंगी बंब सर्व्हिसिंगला असल्याचे कारण देणे म्हणजे पालिकेचा निष्काळजीपणा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक आमदारांनी व प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन सावंतवाडी शहरासाठी कायमस्वरूपी सक्षम आणि सज्ज अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here