‘ओंकार’ नावाच्या वन्य हत्तीने आता आपला मोर्चा कुडाळ तालुक्याकडे वळवला आहे. आकेरी येथे काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा हा ओंकार सावंतवाडीच्या दिशेने रवाना

सावंतवाडी / कुडाळ: विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून मुक्तसंचार करणाऱ्या ‘ओंकार’ नावाच्या वन्य हत्तीने आता आपला मोर्चा कुडाळ तालुक्याकडे वळवला आहे. आकेरी येथे काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा हा ओंकार सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाला आहे
सावंतवाडीची सीमा पार करत हा हत्ती कुडाळ तालुक्यातील आकेरी गावात दाखल झाला असून, त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. मात्र, दुसरीकडे या हत्तीमुळे शेती व बागायतीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे ढग जमा झाले आहेत.

असा राहिला ‘ओंकार’चा प्रवास
‘ओंकार’ हत्तीचा प्रवास अत्यंत रंजक आणि तितकाच दहशत निर्माण करणारा ठरला आहे. गोवा राज्य तसेच दोडामार्ग तालुक्यातून प्रवेश केल्यानंतर त्याने सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घातला.

सावंतवाडीतील टप्पे: ओटवणे, असनिये, कोनशी, इन्सुली, मळगाव आणि नेमळे या गावांमधून प्रवास करत तो पुढे सरकला.

नवी हद्द: नेमळे पार केल्यानंतर ‘ओंकार’ने कुडाळ तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला असून सध्या तो आकेरी गावात विसावला आहे.

कौतुक आणि गर्दी, पण शेतकरी चिंतेत
ओंकार गावात आल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी आणि वाटचाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. काहींसाठी हा कौतुकाचा विषय ठरत असला, तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मात्र यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हत्तीच्या वावरामुळे भातशेती, नारळ, सुपारी व केळीच्या बागांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी पुरते मेटाकुटीला आले आहेत.

वनविभागाकडे नुकसानभरपाईची मागणी
हत्तीच्या या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, वनविभागाने तात्काळ या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नुकसानभरपाई: ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व बागांचे नुकसान झाले आहे, त्यांचे तात्काळ पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी.

सुरक्षा उपाय: हत्तीला मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित जंगलाच्या दिशेने हाकलण्यासाठी वनविभागाच्या पथकाने तातडीने उपाययोजना कराव्यात.

गोवा, दोडामार्ग आणि सावंतवाडी फिरून आता कुडाळ तालुक्यात मुक्काम ठोकलेला ‘ओंकार’ पुढे कुठे प्रवास करतो, तो पुन्हा मागे फिरतो की पुढे जातो? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असताना ओमकार ने यू टर्न घेतला असून तो पुन्हा सावंतवाडीच्या दिशेने माघारी फिरला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here