तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ ‘नंबर वन’ करणार; संदीप गावडे यांचा निर्धार!

भूतनाथ मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शानदार शुभारंभ; प्रमोद गावडेंचे आशीर्वाद पाठीशी असल्याचा दावा

सावंतवाडी दि.३१: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ केवळ नावापुरता मर्यादित न ठेवता, तो विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात ‘आदर्श’ आणि ‘क्रमांक एक’वर नेण्याचा संकल्प महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी व्यक्त केला आहे. आज तळवडे येथील ग्रामदैवत श्री देव भूतनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकला.

भक्तीमय वातावरणात प्रचाराचा प्रारंभ
प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी मंदिरात पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. देवदर्शन घेऊन रणांगणात उतरलेल्या संदीप गावडे यांनी मतदारांशी संवाद साधत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

विकासकामांच्या जोरावर मतदारांना साद
आपल्या कामाचा पाढा वाचताना संदीप गावडे म्हणाले की, “मी आणि माझे प्रतिस्पर्धी एकाच वेळी राजकारणात आलो, मात्र मी केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित न राहता सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांत सातत्याने काम केले आहे.” त्यांनी प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर दिला:

शिक्षण: विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि शाळांमध्ये भौतिक सुविधांची उपलब्धता.ऊर्जा: सोलर पॅनेलच्या माध्यमातून गावागावांत अखंडित वीजपुरवठा. “माझ्या कामाची तुलना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कामाशी जनतेने स्वतः करावी,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.

नाराजी नाट्यावर पडदा?
तिकीट न मिळाल्याने ज्येष्ठ नेते प्रमोद गावडे नाराज असल्याच्या चर्चांवर संदीप गावडे यांनी स्पष्टीकरण दिले. “मी प्रमोद गावडे यांची भेट घेतली असून त्यांची कोणतीही नाराजी नाही. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि लवकरच ते पूर्ण ताकदीने प्रचारात उतरतील,” असे सांगत त्यांनी अंतर्गत कलहाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.दिग्गजांच्या साथीने विकासाचा ‘रोडमॅप’
मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीच्या नेत्यांचे पूर्ण सहकार्य असल्याचे सांगत गावडे यांनी आगामी काळातील उद्दिष्टे स्पष्ट केली:

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावणे.काजू उत्पादक आणि उद्योजकांच्या समस्या सोडवणे.पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निधी खेचून आणणे.”तळवडे मतदारसंघाचा कायापालट करणे हेच माझे ध्येय आहे,” असे सांगत त्यांनी मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here