सावंतवाडी येथे संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करताना जिल्हा कार्याध्यक्ष बाबुराव चव्हाण सोबत डॉ शरद जाधव गणेश म्हापणकर जगदीश चव्हाण नरसु रेडकर कल्याण कदम आदी
सावंतवाडीत चर्मकार उन्नती समाज मंडळाच्या वतीने 650 वी जयंती साजरी
सावंतवाडी दि.०१:
संत श्रेष्ठ सद्गुरू रोहिदास महाराज हे केवळ चर्मकार समाजाचेच नव्हे, तर अखिल समाजाचे संत होते. उच्च-नीच असा कोणताही भेद नसून सर्व माणसे समान आहेत, ही शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे यापुढील संत रोहिदास महाराजांची जयंती गावागावांत, वाडी-वस्तीवर सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन, प्रबोधनात्मक स्वरूपात साजरी करावी, असा एकमताने ठराव सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेच्या वतीने आयोजित संत रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती उत्सवानिमित्त मांडण्यात आला.
ही जयंती सावंतवाडी येथील समाज मंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रमाणे भव्य स्वरूपात साजरी व्हावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या भूमिकेला सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने सहमती दर्शविण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. शरद जाधव होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, समाजाने जातीपातीच्या बंधनांचे दुष्परिणाम अनुभवले आहेत. भविष्यात संत रोहिदास महाराजांचे विचार अंगीकारून त्यांची जयंती समाजबांधवांमध्ये व्यापक स्वरूपात साजरी केली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव जगदीश चव्हाण यांनी केले. त्यांनी ८ फेब्रुवारी रोजी इन्सुली येथे संत रोहिदास जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच सांगेली व कोलगाव येथेही जयंती उत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी संत रोहिदास महाराजांचे गाढे अभ्यासक पी. बी. चव्हाण यांनी संत रोहिदास यांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शूद्र व अतिशूद्रांना देखील परमेश्वराच्या भक्तीचा पूर्ण अधिकार आहे, हे संत रोहिदासांनी ठामपणे मांडले. जगात कोणी लहान-मोठा नाही, सर्व समान असून सर्वांना पोटभर अन्न मिळेल, असे सुखी राज्य असावे, अशी त्यांची संकल्पना होती. त्यांच्या विचारांनी तत्कालीन राजे-महाराजेही प्रभावित झाले होते आणि त्यामुळे त्यांना धर्मगुरूचा मान मिळाला होता, असेही त्यांनी नमूद केले.
अभिवादनपर भाषणात पी. बी. चव्हाण म्हणाले की, संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी समता, बंधुता व आत्मसन्मानाचे धडे दिले असून ते केवळ एका जातीपुरते मर्यादित नसून पुरोगामी विचारांचे व्यापक व्यासपीठ होते. संत रोहिदास महाराजांचा पाठ्यपुस्तकांत समावेश व्हावा तसेच शाळांमधून त्यांची जयंती साजरी करण्याबाबत शासनाने दिलेल्या आदेशांची योग्य अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष बाबुराव चव्हाण यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तालुका उन्नती मंडळाचे प्रभारी अध्यक्ष तथा वेंगुर्ले पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. शरद जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक कल्याण कदम, सचिव जगदीश चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष बाबुराव चव्हाण, जिल्हा सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरसू रेडकर, तालुका सहसचिव राजेश फोंडेकर, जिल्हा मार्गदर्शक निवृत्त उपशिक्षणाधिकारी पी. बी. चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष व निवृत्त कर्मचारी गणेश म्हापणकर, तालुका सहसचिव संजय बांबुळकर, तालुका सदस्य संभाजी कांबळे, निवृत्त एसटी कर्मचारी विजय ओटवणेकर, संदीप बिबवणेकर, वेंगुर्ले कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, तालुका मार्गदर्शक लक्ष्मण आरोसकर, सूर्यकांत सांगेलकर तसेच बांदा येथील सुधाकर बांदेकर, माडकर आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण हे अपरिहार्य कारणामुळे अनुपस्थित राहिल्याने अध्यक्षपदाचा मान उपाध्यक्ष डॉ. शरद जाधव यांना देण्यात आला.