घोषणांचा पाऊस… विकासाचा दुष्काळ! रेल्वे टर्मिनसचे काम नक्की कधी?
२०१५ ची घोषणा, २०१९ चे भूमिपूजन… २०२६ उजाडले तरी ‘जैसे थे”!नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वेला २.८१ लाख कोटी मिळाले, पण आपल्या सावंतवाडीच्या वाट्याला काय? ❌ २०१५ पासून फक्त घोषणा! ❌ २०१९ ला झालेले भूमिपूजन हवेतच! ❌ पाणीपुरवठा आणि प्लॅटफॉर्मचे काम आजही अधांतरी!
आता वेळ आली आहे जाब विचारण्याची… आम्हाला आश्वासने नको, ‘परिपूर्ण कोचिंग टर्मिनस’ हवे! ✊
——————–++++++++++
‘मत हवे तर टर्मिनस द्या!’; सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या दुरावस्थेवरून जनतेचा संताप
घोषणांचा पाऊस, पण विकासाचा दुष्काळ; जागरूक सावंतवाडीकरांचा लोकप्रतिनिधींना थेट इशारा
सावंतवाडी दि.०२: गेल्या अनेक वर्षांपासून केवळ घोषणांच्या भोवऱ्यात अडकलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न आता चांगलाच तापू लागला आहे. “आता आश्वासने नकोत, प्रत्यक्ष काम दाखवा, अन्यथा मत मागायला येऊ नका,” अशा आक्रमक पवित्र्यात सावंतवाडीकर दिसत असून सोशल मीडियासह सर्वच स्तरांतून लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
घोषणांची ‘एक्स्प्रेस’ धावतेय, पण काम ‘शंटिंग’लाच!
सावंतवाडीच्या रेल्वे विकासाचे स्वप्न कागदावरच असल्याचे सांगत स्थानिकांनी पुराव्यांसह प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत
हॉटेल प्रकल्पाचा फार्स: जून २०१५ मध्ये घोषणा झालेल्या आणि मे २०१९ मध्ये सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ‘रेलोटेल हॉटेल’चे काम अद्याप सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०२५ मध्ये पुन्हा एकदा याच हॉटेलच्या बांधकामाची घोषणा झाली, ज्यामुळे “नक्की काम कधी होणार?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तिलारीच्या पाण्याचा प्रश्न: टर्मिनससाठी अत्यावश्यक असलेल्या पाणीपुरवठ्याची निविदा प्रक्रिया नेकी कुठे अडकली आहे? याचे उत्तर आजही जनतेला मिळालेले नाही.
अपुऱ्या सुविधा: नवीन प्लॅटफॉर्म, रेल्वे रूळ आणि इतर तांत्रिक सुविधांच्या घोषणा केवळ पोकळ ठरल्याचा आरोप होत आहे.
‘जागरूक सावंतवाडीकर’ आक्रमक
“मत हवे तर टर्मिनस द्या,” हा नवा नारा आता सावंतवाडीत घुमू लागला आहे. विकासाच्या नावाखाली केवळ निवडणुकांपुरती आश्वासने देणाऱ्या नेत्यांना आता जनता जाब विचारत आहे. परिपूर्ण रेल्वे कोचिंग टर्मिनससाठी तातडीने निधी उपलब्ध करून कोकणच्या रेल्वे विकासाला गती द्यावी, अशी कळकळीची विनंती ‘जागरूक सावंतवाडीकर’ समूहाने केली आहे.
“विकासाचे स्वप्न आम्ही गेली अनेक वर्षे पाहत आहोत, पण १५ फेब्रुवारी २०२५ च्या संदर्भाप्रमाणे आजही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आता आम्हाला केवळ कागदी प्रकल्प नकोत, तर जमिनीवर काम हवे आहे.” — सावंतवाडीचे स्थानिक नागरिक



