सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला चार वर्षांनंतर मिळाला कायमस्वरूपी फिजिशियन; डॉ. विशाल रेड्डी रुजू

सावंतवाडी दि.०७ : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची गेल्या चार वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रुग्णालयात फिजिशियन म्हणून डॉ. विशाल नंदकुमार रेड्डी यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडीसह परिसरातील हृदयविकार आणि गंभीर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉ. विशाल रेड्डी यांचे स्वागत सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे उपस्थित होते. डॉ. रेड्डी यांच्या नियुक्तीमुळे रुग्णालयातील महत्त्वाचा अनुशेष भरून निघाला आहे.

डॉ. अभिजीत चितारी यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. यासाठी अनेक स्तरांवरून प्रयत्न झाले होते:
सामाजिक पाठपुरावा: रुग्ण कल्याण समिती, सावंतवाडी नागरिक कृती समिती आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला होता.
न्यायालयीन लढा: या नियुक्तीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली होती.
राजकीय प्रयत्न: सिंधुदुर्ग चे सुपुत्र तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण,पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही नियुक्ती यशस्वी झाली आहे.
माजी पालकमंत्र्यांचे योगदान
मध्ये काही काळ फिजिशियन नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. त्यावेळी माजी पालकमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्वखर्चातून खाजगी फिजिशियनची नियुक्ती केली होती. सुमारे चार महिने त्यांनी ही सेवा सुरू ठेवून रुग्णांना आधार दिला होता. या प्रक्रियेत ॲड. अनिल निरवडेकर यांचाही मोलाचा सहभाग होता.
रुग्णांची होणारी फरफट थांबणार
गेल्या चार वर्षांत फिजिशियन नसल्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना गोवा (बांबोळी), जिल्हा रुग्णालय किंवा कोल्हापूर-बेळगाव येथील खाजगी रुग्णालयांत हलवावे लागत होते. उपचाराअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या होत्या. मात्र या नियुक्तीबद्दल संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.

आता डॉ. विशाल रेड्डी यांच्या नियुक्तीमुळे हृदयरोग रुग्णांना स्थानिक पातळीवर तातडीने उपचार मिळतील.क्रिटिकल केअर सुविधेमुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांचे प्राण वाचवणे सुलभ होईल.गरीब रुग्णांचा खाजगी रुग्णालयातील मोठा खर्च वाचणार आहे.”सावंतवाडीकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या एकजुटीच्या लढ्याला यश आले असून, आता रुग्णांना उपचारासाठी परराज्यात धाव घेण्याची गरज भासणार नाही.” — ॲड. अनिल निरवडेकर (उपनगराध्यक्ष, सावंतवाडी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here