‘११२’ वर आलेल्या कॉलने फुटले बिंग!
सावंतवाडी दि.३०: शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, गुरुवारी रात्री बाहेरचावाडा परिसरात एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत १२ ते १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात शहरातील काही ‘बड्या धेंड्यांचा’ समावेश असल्याची चर्चा रंगली आहे.
सावंतवाडीच्या बाहेरचावाडा परिसरात एका बंदिस्त घरात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे, ही कारवाई ‘११२’ (Emergency Response Support System) या आपत्कालीन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत रात्री साडेआठच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.
ठिकाण: बाहेरचावाडा परिसर, सावंतवाडी.वेळ: रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलेले अंदाजे १२ ते १३ जण आहेत.पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून संशयितांची चौकशी सुरू आहे.या कारवाईत सापडलेल्या लोकांमध्ये काही प्रतिष्ठित आणि बड्या व्यक्तींचा समावेश असल्याने संपूर्ण सावंतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात तक्रारदाराने दाखवलेल्या धाडसामुळे हा अड्डा उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.


