अन्यथा वीज महावितरण च्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा नगरसेवक देव्या सूर्याजींचा इशारा
सावंतवाडी दि.३१: बाजारपेठेतील संचयनी पॅलेसच्या मागील बाजूस असलेला वीज महावितरणचा फिडर पिलर उघडा पडला असून महावितरणचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिक, लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. येत्या चार दिवसात महावितरणने लक्ष द्यावे अन्यथा, महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
महावितरणचे बाजारपेठेतील भागाकडे देखील लक्ष नाही. संचयनी पॅलेस ही निवासी इमारत आहे, लहान मुलं खेळतात. यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर महावितरण प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल त्यांनी केला. तर, एकीकडे पालकमंत्री नितेश राणे व माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर मागणी केल्यानंतर अशा कामांसाठी निधी उपलब्ध करून देतात. मात्र,अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. कादरी मशिद येथील स्ट्रीट लाईटचा बॉक्स देखील अनेक महिने उघडा पडला होता. इशारा दिल्यानंतर तो बदलण्यात आला. त्यामुळे शहरात वस्तीच्या ठिकाणी असलेले उघडे असणारे ट्रान्स्फॉर्मर, फिडर पिलर चार दिवसांत न बदलल्यास वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.