सावंतवाडीत ‘सुरमयी दिवाळी पहाट’चा सुरेल नजराणा; सांस्कृतिक परंपरा कायम टिकवणे हेच उद्दिष्ट – दीपक केसरकर


सावंतवाडी दि.१०: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या संगीत सोहळ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “सावंतवाडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असून, येथील नाटकांची आणि संगीताची समृद्ध परंपरा कायम टिकवून ठेवण्याचे काम विविध कला संस्था व कलाकारांनी केले आहे,” असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले, “महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या सुंदर कार्यक्रमाचा मान सावंतवाडीला दिल्याबद्दल मी या खात्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे मनःपूर्वक आभार मानतो. ॲड. शेलार हे सावंतवाडीचे जावई आहेत, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. सावंतवाडीतील अनेक सांस्कृतिक चळवळींमध्ये आणि नाटकांमध्ये माझ्या कुटुंबाचेही मोठे योगदान राहिले आहे. आमचे वडील स्वतः नाटकाचे प्रयोग करायचे, इतकेच नव्हे तर नाट्य कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांच्या हे नाट्यगृह एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यापर्यंत ते प्रेमाने मदत करत असत.”
पुढे बोलताना केसरकर म्हणाले, “सावंतवाडीची संगीताची ही थोर परंपरा आजही सद्गुरू संगीत विद्यालयामुळे जिवंत आणि प्रवाही राहिली आहे. गुरुवर्य निलेश मेस्त्री, किशोर सावंत आणि बाळ पुराणिक यांचे या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. निलेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर अनेक उत्तम विद्यार्थी घडले आहेत. मी नगराध्यक्ष असल्यापासून सावंतवाडीत ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. गेल्या २१ वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरू आहे. यंदा ही ‘सुरमयी दिवाळी पहाट’ साजरी करण्याची संधी सावंतवाडीला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आभार व्यक्त करतो.”
नाट्यसंगीत, भक्तिगीते आणि मराठी गाण्यांची मेजवानी
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गुरुवर्य निलेश मेस्त्री यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर रंगलेल्या या सुरमयी महोत्फिलात संगीत संयोजन किशोर सावंत यांनी सांभाळले, तर निलेश मेस्त्री यांनी हार्मोनियमवर सुरेल साथसंगत केली. युवा तबलावादक निरज भोसले, अश्विन जाधव, मंगेश मेस्त्री, संगीत शिक्षक गायक नितीन धामापूरकर,गायिका वर्षा देवण, केतकी सावंत, समृद्धी सावंत आणि ॲड. सिद्धी परब यांनी आपल्या सुमधुर आवाजात नाट्यसंगीत, भक्तिगीते आणि लोकप्रिय मराठी गाण्यांचा सुरेल नजराणा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक प्रा संजय कात्रे यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक,निवृत्त शिक्षक म. ल. देसाई, भरत गावडे, दीपक पटेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, नकुल पार्सेकर, संजय कात्रे, नायब तहसीलदार सविता कासकर, तसेच ‘सुरमयी दिवाळी पहाट’चे समन्वयक आर्यन देसाई प्रा.प्रतिभा चव्हाण, मालवणी कवी दादा मडकईकर,सुधीर धुमे कौस्तुभ पेडणेकर आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन रूपेश पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार सविता कासकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here