वसईत महिलेवर अत्याचार करून सावंतवाडीत लपलेला आरोपी जेरबंद; पोलिसांची धडक कारवाई


ध्रुवकुमार शिवसहाय शर्मा (५१, रा. नालासोपारा, मुंबई) असे या आरोपीला जेरबंद करतांना सावंतवाडी पोलीस

सावंतवाडी दि.३१ वसई-विरार परिसरात एका महिलेवर अत्याचार करून पसार झालेल्या संशयित आरोपीला सावंतवाडी पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. ध्रुवकुमार शिवसहाय शर्मा (५१, रा. नालासोपारा, मुंबई) असे या आरोपीचे नाव असून, त्याला पुढील कारवाईसाठी नालासोपारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा (तुळीज) पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप ध्रुवकुमार शर्मा याच्यावर आहे. या गुन्ह्यानंतर अटकेच्या भीतीने आरोपी मुंबईतून पळून गेला होता. तो कोकणात, विशेषतः सावंतवाडी शहरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
नालासोपारा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना संशयित आरोपी सावंतवाडीत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक निलेश परब आणि हवालदार मनोज राऊत यांनी तातडीने शोधमोहीम राबवली. अत्यंत गोपनीयरीत्या तपास करत पोलिसांनी आरोपीचा पत्ता शोधून काढला आणि त्याला बेड्या ठोकल्या.
सावंतवाडी पोलिसांनी पकडलेल्या या संशयिताला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नालासोपारा पोलिसांच्या पथकाकडे सोपवण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांसाठी ‘सेफ झोन’ समजत लपणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here