“तो लढतोय केवळ विकासासाठी…!”

कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात महेश सारंग यांचा विकासाचा ठाम अजेंडा

सावंतवाडी दि.०२:
सावंतवाडी शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेले कोलगाव गाव शहरालगत असल्याने विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, ही येथील प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. मात्र हा विकासाचा भार कोण समर्थपणे पेलू शकतो, असा प्रश्न निर्माण होताच महेश सारंग हे नाव आपसूकच पुढे येते.
महेश सारंग यांची राजकीय कारकीर्द सरपंच पदापासून सुरू झाली. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धाडसी आणि लोकाभिमुख निर्णय घेत आपल्या नेतृत्वाची ठळक छाप उमटवली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीत मातोश्री वृंदा सारंग यांनी सावलीसारखे सोबत राहून त्यांना बळ दिले.
जीवनात आलेल्या अनेक कटू प्रसंगांवर मात करत महेश सारंग यांनी संयम आणि चिकाटीने पुढे वाटचाल केली. त्यांच्यावर झालेले आरोप व टीकांना त्यांनी शब्दांनी नव्हे, तर ठोस विकासकामांच्या माध्यमातून उत्तर दिले. ही कामे इतकी प्रभावी ठरली की विरोधक वेळोवेळी चितपट होत गेले.
आज कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव व कारिवडे या गावांचा समावेश असलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघातून महेश सारंग हे भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व इतर घटक पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आरोपांची मालिका सुरू असली तरी महेश सारंग मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे विकासकामांवर भर देताना दिसत आहेत.
“माझा एकमेव मुद्दा हा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आहे,” असे ते ठामपणे सांगतात. रस्ते, पाणी, वीज, सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. मतदारसंघातील वाडी-वाडीपर्यंत पोहोचलेले रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज व्यवस्था ही त्यांच्या कामांची पोचपावती ठरत आहेत.
घरकुल योजनांच्या बाबतीत जिल्ह्यात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी मंजूर करून आणलेली घरकुले ही विरोधकांच्या गणिताच्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे बोलले जाते. तसेच युवकांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक युवकांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
“युवा हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा आणि देशाचा विकास करावा,” ही त्यांची प्रामाणिक भूमिका आहे. रात्री-अपरात्री नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा, ऊन-पावसाची तमा न बाळगता काम करणारा, केवळ बोलणारा नव्हे तर करून दाखवणारा नेता म्हणून महेश सारंग यांची ओळख निर्माण झाली आहे.
विरोधकांकडे विकासाचा ठोस मुद्दा नसल्याने केवळ विरोधाला विरोध सुरू असल्याची चर्चा असली, तरी महेश सारंग हे विकासाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांचा विजय निश्चित असल्याचा सूर सर्वत्र ऐकू येत आहे.
म्हणूनच आज सर्वत्र एकच चर्चा —
“तो लढतोय केवळ विकासासाठी…!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here