दोन दिवसांत सुमारे ८ लाख भाविकांचे दर्शन; महाप्रसाद व दर्शनासाठी प्रचंड गर्दी
सिंधुदुर्ग दि.११: ध्वनीक्षेपकावर सुरू असलेला देवीचा गजर, महाप्रसादाचा सोहळा पाहण्यासाठी देवालयाच्या प्रांगणाबाहेर उसळलेली भाविकांची गर्दी आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेला—असा नजारा सोमवारी रात्री आंगणेवाडीत पाहावयास मिळाला. प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवाची मंगळवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात सांगता झाली.
महाप्रसादाची ताटे लावण्याच्या कार्यक्रमासाठी सोमवारी रात्री ९.५० वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली होती. ही रांग पुन्हा रात्री १.०० नंतर सुरू झाली. सकाळी तसेच सायंकाळी भाविकांची उच्चांकी गर्दी अनुभवायला मिळाली. मंगळवारीही आंगणेवाडी यात्रेचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कुटुंबासह रात्री देवीचे दर्शन घेतले. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बंड्या सावंत आदी उपस्थित होते. तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी मंगळवारी देवीचे दर्शन घेतले.
यात्रेच्या दोन दिवसांत सुमारे ८ लाख भाविकांनी आई भराडीचे दर्शन घेतले. मंगळवारी सायंकाळनंतरही दर्शन रांगांमधील भाविकांचा ओघ सुरूच होता. मंगळवारी आंगणे ग्रामस्थांनी देवीचे दर्शन घेऊन ओट्या भरल्या. नवस बोलणे, नवस फेडणे व ओटी भरणे हे विधी सायंकाळपर्यंत सुरू होते.
यात्रोत्सवातील महत्त्वाचा महाप्रसाद ताटे लावण्याचा कार्यक्रम शनिवारी रात्री ९.५० वाजता सुरू झाला. प्रथम मानकऱ्यांची ताटे सवाष्ण महिलांकडून देवीच्या प्रांगणात आणण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या घरांतून आणलेली महाप्रसादाची ताटे लावण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.
सायंकाळनंतर भाविकांची गर्दी वाढत गेली. रात्री बारा नंतर तर देवालयाबाहेरील परिसरात रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते. यात्रेच्या दोन दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झाली. खेळण्यांच्या भागात लहान मुलांची गर्दी होती. मोड जत्रेत शेतीची अवजारे व गृहपयोगी साहित्य खरेदीसाठीही मोठी गर्दी झाली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बचतगटांच्या स्टॉलना चांगला प्रतिसाद मिळाला.
भाविकांच्या सोयीसाठी एकूण नऊ दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. योग्य नियोजनामुळे भाविकांना अल्प वेळेत दर्शन मिळत होते. ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने स्वागत कक्षातून वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या. ही व्यवस्था आंगणे कुटुंबीय व रोहन व्हिडिओ कॉम्प्युटेक, मुंबई यांच्या वतीने करण्यात आली होती. सायंकाळनंतर आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.
🧹 आंगणेवाडीत आज स्वच्छता अभियान
यात्रेनिमित्त निर्माण झालेला कचरा हटवण्यासाठी आज आंगणेवाडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. इच्छुक शाळांनी मंडळाचे कार्याध्यक्ष बाळा आंगणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीनेही स्वतंत्र स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने मसुरे, कणकवली, मालवण आदी ठिकाणांहून हंगामी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात्रोत्सव यशस्वी केल्याबद्दल आंगणेवाडी कुटुंबीयांच्या वतीने मुंबई मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी पोलीस प्रशासन, वीज वितरण, महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग तसेच देवीचे भक्त व स्वयंसेवकांचे आभार मानले.


