सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीनंतर नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले सध्या रजेवर असल्याने पालिकेचा कारभार नेमका कोणाच्या हाती आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. उपनगराध्यक्ष अॅड. निरवडेकर यांच्याकडे प्रत्यक्ष चार्ज दिला आहे का, याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी पत्रकार परिषदेत केला.
शहरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, उभाबाजार परिसरात अनेक घरांत गेल्या तीन दिवसांपासून पाणी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण स्वच्छता आणि नगरसेवकांचा संपर्क नसल्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत, या कालावधीत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.



