‘प्रती झाड ₹२२० म्हणजे बागायतदारांची थट्टाच’; जाब विचारण्यासाठी वर्षा बंगल्यावर धडक देणार – राजू शेट्टी

देवगड दि.१२:“कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना नुकसानीपोटी प्रती झाड अवघी २२० ते २५० रुपये मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. या फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांसह थेट मुंबई येथील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देणार,” असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

देवगड येथील जामसंडे येथे आयोजित आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघाच्या ‘एल्गार मेळाव्यात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘बिलंदर मुख्यमंत्री’ अशी घणाघाती टीका केली.

सरकारकडे बागायतदारांसाठी पैसे नाहीत का?
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, “शक्तीपीठ महामार्ग किंवा कुंभमेळ्यासारख्या इव्हेंटसाठी सरकारकडे हजारो कोटी रुपये आहेत. नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी मुख्यमंत्री सिंधुदुर्गात येतात, मात्र संकटात सापडलेल्या बागायतदारांशी संवाद साधायला त्यांना वेळ नाही. बागायतदारांची मागणी प्रती झाड ५ हजार रुपयांची असताना, सरकारने दिलेली तुटपुंजी मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.”

परराज्यातील आंब्याविरोधात मोहीम
कोकणच्या हापूसच्या नावाने परराज्यातील आंबा विकणाऱ्यांविरोधातही शेट्टी यांनी कडक इशारा दिला. “देवगड आणि रत्नागिरी हापूसच्या नावाखाली इतर राज्यातील आंबा विकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे आंबे थेट रस्त्यावर फेकून देऊ,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच व्यापाऱ्यांनी बागायतदारांकडून बेकायदेशीर व्याजाची वसुली केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

रत्नागिरीच्या मेळाव्यात तारीख ठरणार
मुंबईतील आंदोलनाची निश्चित तारीख शनिवार, ११ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या मेळाव्यात जाहीर केली जाणार आहे. या आंदोलनात कोकणातील जास्तीत जास्त बागायतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार बाळ माने यांनी केले.

स्थानिक नेत्यांचा सरकारवर निशाणा
सुशांत नाईक: “नुकसानीचे पंचनामेच झाले नसताना सरकार मदत कशी देणार? सत्ताधारी लोकप्रतिनिधी संकटाच्या काळात कुठे गायब आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुधीर जोशी: “प्रती झाड २२० रुपये देणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? कोकणच्या आमदारांनी विधानसभेत आवाज उठवायला हवा होता.”

या मेळाव्याला माजी आमदार बाळ माने, काका ढोके, संजय गावडे, सुशांत नाईक, सुधीर जोशी, विष्णू घाडी यांसह मोठ्या संख्येने बागायतदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण टेंबुलकर यांनी केले, तर सूत्रसंचालन सागर जोईल यांनी केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here