सावंतवाडी दि. १५: ओटवणे गावाला गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. माझ्या कुटुंबाचे या गावाशी पिढ्यानपिढ्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे ओटवणेसह करमळगाळूवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या विविध योजनांमधून सर्वतोपरी निधी व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली.
ओटवणे-करमळगाळूवाडी येथील लिंग देवस्थान येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी, पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गावकर, सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक
यावेळी बोलताना अशोक दळवी यांनी करमळगाळूवाडीतील आबालवृद्ध ग्रामस्थ प्रथमच अशा प्रकारे एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. वाडीच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गावकर यांनी वाडीतील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तर सरपंच आत्माराम गावकर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या वाडीच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले.
मान्यवरांचा सत्कार
कार्यक्रमात विक्रांत सावंत, अशोक दळवी, उत्कर्षा गावकर यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला रवींद्र म्हापसेकर, रवींद्र गावकर, सगुण गावकर, उमेश गावकर, संजय कानसे, सिद्धेश कलिंगण, विश्वनाथ केळकर, गोविंद देवधर, मनोहर मयेकर, पोलीस पाटील शेखर गावकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अश्विनी तावडे यांनी केले, तर अक्षय तावडे यांनी आभार मानले.
अधिक माहितीसाठी पहा: akhandhindustanlive.com
अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज
संपर्क: ९४२२०५४८८७ / ८२७५६५९५६३


