सिंधुदुर्ग दि.२७: दक्षिण कोकणच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या परिस्थितीत सावंतवाडी येथे टर्मिनस उभारणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य (Feasible) नाही आणि रेल्वेकडे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही, असे स्पष्ट मत प्रशासनाने व्यक्त केले आहे. यामुळे आता या प्रकल्पाचा चेंडू थेट केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या कोर्टात गेला आहे.
कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर यांनी सावंतवाडी टर्मिनसच्या मागणीसाठी पुकारलेल्या उपोषणानंतर, बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या (KRCL) मुख्य कार्यालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (CCM) आशुतोष श्रीवास्तव आणि सिव्हिल विभागाचे एल. प्रकाश यांनी प्रकल्पातील अडचणींची माहिती दिली.टर्मिनससाठी लागणारा निधी प्रचंड असून, कोकण रेल्वेच्या सध्याच्या बजेटमध्ये अशी तरतूद करणे अशक्य आहे.सध्याच्या रचनेत सावंतवाडी स्टेशनचे पूर्ण क्षमतेच्या टर्मिनसमध्ये रूपांतर करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष निधी मिळवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आता राजकीय इच्छाशक्तीची कसोटी
प्रशासनाने हात वर केल्यामुळे आता या प्रश्नाला राजकीय वळण मिळाले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार नारायण राणे आणि सुनील तटकरे यांनी हा विषय लोकसभेत लावून धरावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच, मुंबई-ठाणे परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या कोकणी मतदारांच्या जोरावर तेथील खासदारांनीही रेल्वे मंत्रालयावर दबाव निर्माण करणे आवश्यक बनले आहे.
चौकट
सावंतवाडी टर्मिनस का आवश्यक आहे?
सावंतवाडी स्टेशनचे टर्मिनसमध्ये रूपांतर झाल्यास दक्षिण कोकणचा चेहरामोहरा बदलू शकतो.सावंतवाडी गाड्यांचे उगमस्थान (Originating point) बनल्यास स्थानिकांना ‘कन्फर्म सीट’ मिळणे सुलभ होईल.सध्या मडगावपर्यंत जाणाऱ्या गाड्या सावंतवाडीत थांबवता येतील, ज्यामुळे गोवा रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होईल.गाड्यांच्या देखभालीसाठी आणि साफसफाईसाठी लागणारी यंत्रणा येथे उपलब्ध झाल्यास नवीन गाड्या सुरू करणे शक्य होईल.या बैठकीत कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत, सुरेंद्र नेमळेकर, गणेश परब, अमित नार्वेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी टर्मिनससह कोकण रेल्वेच्या इतर प्रवाशांच्या समस्यांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.


