
सिंधुदुर्ग दि.३०: भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या एशियन रायफल – पिस्टल शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय शुटींग प्रशिक्षक ॲड.विक्रम भांगले यांची या एशियन स्पर्धा आयोजन समितीवर निवड झाली आहे. दिल्ली येथील कर्नेलसिंग आंतरराष्ट्रीय शुटींग रेंजवर दिनांक 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या काळात ही स्पर्धा पार पडणार आहे. भारताला एशियन शुटींग चॅम्पियनशिप सारख्या महत्वपूर्ण स्पर्धेचे आयोज़न करण्यासाठी ही प्रथमच संधी प्राप्त झाली आहे. येऊ घातलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा आणि भविष्यात आयोजनाची संधी मिळण्याची शक्यता असलेल्या ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन हे अतिशय महत्वपूर्ण समजले जात आहे. या स्पर्धेमध्ये आशिया खंडातील विविध देशातील सुमारे 575 खेळाडू सुवर्ण पदकासाठी आपलं कौशल्य पणाला लावणार आहे. सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले ॲड. विक्रम भांगले यांनी नॅशनल रायफल असोसिएशनच्या कोशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्यावर प्रथमच ही आयोज़न समितीची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात वकीली करणारे ॲड. भांगले यांनी यापूर्वी भारतीय संघाचा नेमबाजी प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. तसेच वर्ल्डकप, जागतिक शुटींग स्पर्धा, आशियाई व क्रीडा स्पर्धा ,कॉमनवेल्थ स्पर्धा अशा अनेक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये त्यांनी पंच आणि ऑफिशिअल्स म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


