वर्देतील तरुणीच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद; मठ येथून मध्यरात्री पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कुडाळ दि.१८: तालुक्यातील वर्दे येथे महाविद्यालयीन तरुणी दामिनी किरण पालव हिच्या निर्घृण खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करण्यात यश मिळवले आहे. साईल विश्राम धुरी असे त्याचे नाव असून, वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील त्याच्या घरातून मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले. या धडक कारवाईमुळे हत्येमागील नेमक्या कारणाचा लवकरच उलगडा होणार आहे.

काल सायंकाळी वर्दे येथे भरवस्तीत दामिनी पालव हिच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. या थरारक घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची सहा विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून कसून शोधमोहीम राबवण्यात आली आणि अखेर पोलिसांनी मध्यरात्री मठ येथून संशयित आरोपी साईल धुरी याला ताब्यात घेतले.

हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, यामागे काही पूर्ववैमनस्य किंवा जुना वाद होता का, तसेच या कृत्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत. या वेगात झालेल्या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचे कौतुक होत असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाच्या तपासाकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here