सावंतवाडीच्या शाळा क्र. ५ ला उर्जितावस्था देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात!

 

सावंतवाडी दि.१८: शाळेचे ऋण जपण्याची भावना आणि जुन्या शाळेला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प अशा सकारात्मक वातावरणात सावंतवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ५ मध्ये सरस्वती पूजनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुमलता सुकी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांनी एकत्र येत शाळेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार केला.

या वेळी माजी विद्यार्थी अमोल टेंबकर यांनी आपले आई-वडील कै. मंदा व मंगेश टेंबकर यांच्या स्मरणार्थ शाळेला स्मार्ट टीव्ही भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली. तसेच माजी विद्यार्थी रविंद्र गवस यांनी वॉटर प्युरिफायर, मुनाफ शेख यांनी १० हजार रुपयांची आर्थिक मदत आणि नगरसेविका वीणा जाधव यांनी चार घड्याळे देण्याचे जाहीर केले. याशिवाय, शाळेच्या इतर मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी ही शाळा दत्तक घेतली असून त्यांच्या माध्यमातूनही विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

शाळेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लवकरच माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन केली जाणार असून त्याद्वारे विविध सुविधांसाठी पाठपुरावा केला जाईल, असे मुख्याध्यापिका सुकी यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र शौचालये, सीसीटीव्ही, वॉटर प्युरिफायर आणि बाग विकसित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला उपशिक्षिका उषा पावसकर, सिद्धी मराठे, पत्रकार तथा सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन चे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, भुवन नाईक, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना शिरोडकर, विजय वाडकर, श्रीपाद नाईकवाडे यांसह अनेक माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शाळेचा विद्यार्थी मुख्यमंत्री प्रतीक म्हाडगुत याने उपस्थितांचे स्वागत केले. माजी विद्यार्थ्यांच्या या पुढाकारामुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळून शाळा पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोहोचेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here