वेंगुर्ले एसटी बसस्थानकातील शिपाई मुख्य संशयित; दोघांना दोन दिवसांची वनकोठडी, एकाला न्यायालयीन कोठडी
सावंतवाडी दि.०३ : वाघनखे विक्रीसाठी आणल्याच्या प्रकरणात सावंतवाडी वनविभागाने कुडाळ बसस्थानक परिसरातील काळप नाका येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वन्यप्राण्याचा एक दात, दोन नखे आणि सोन्यामध्ये मढवलेले दोन सुळे जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये वेंगुर्ले एसटी बसस्थानकात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या रोहिदास हरिश्चंद्र कामत यांच्यासह विजय रविकांत शिंदे आणि मुनाफ इस्माईल मुकादम यांचा समावेश आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची वनकोठडी, तर तिसऱ्या संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
२ नोव्हेंबर रोजी कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वाघनखांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक, सावंतवाडी तसेच कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी कारवाईचे नियोजन करून सापळा रचला. या कारवाईदरम्यान वेंगुर्ले बसस्थानकात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या रोहिदास कामत याने बनावट ग्राहक म्हणून गेलेल्या वनाधिकाऱ्यांना वेंगुर्ले येथे बोलावले. तेथे वाघनखांच्या विक्रीसंदर्भात चर्चा झाली आणि १२ वाघनखांच्या विक्रीचा व्यवहार निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
व्यवहारादरम्यान रोख रक्कम आणली आहे का, याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर वाघनखे कुडाळ येथे मिळतील, असे सांगून संबंधितांना कुडाळ बसस्थानक परिसरात येण्यास सांगण्यात आले. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने काळप नाका परिसरात पुन्हा सापळा रचला. संशयित रोहिदास कामत याने विजय शिंदे याच्या माध्यमातून मुनाफ मुकादम याला वाघनखे दाखविण्यासाठी पाठविल्याची माहिती समोर आली आहे. विक्रीच्या व्यवहाराची बोलणी सुरू असतानाच वनाधिकाऱ्यांनी तिघांनाही ताब्यात घेतले.
या कारवाईत रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४७, रा. कामतवाडी, वायंगणी, ता. वेंगुर्ले), विजय रविकांत शिंदे (वय ३१, रा. मुळदे, ता. कुडाळ) आणि मुनाफ इस्माईल मुकादम (वय ४०, रा. अनपूर, विजयदुर्ग, ता. देवगड) यांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांच्या अंगझडतीमध्ये वन्यप्राण्याचा सुमारे पाच सेंटीमीटर लांबीचा एक दात, चार सेंटीमीटर लांबीची दोन नखे तसेच प्रत्येकी सुमारे दोन सेंटीमीटर लांबीचे सोन्यात मढवलेले दोन सुळे जप्त करण्यात आले. जप्त केलेले अवयव नेमके कोणत्या वन्यप्राण्याचे आहेत, याबाबत पुढील तपासातून अधिक स्पष्टता येणार आहे.
संरक्षित वन्यप्राण्यांची शिकार करणे, त्यांचे अवयव किंवा मृगयाचिन्हे तयार करणे आणि विक्रीच्या उद्देशाने ते बाळगणे, या अनुषंगाने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयितांना कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पहिल्या आणि दुसऱ्या संशयिताला दोन दिवसांची वनकोठडी, तर तिसऱ्या संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, जैवविविधतेने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीवांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पश्चिम घाटाच्या परिसरातील हा जिल्हा कर्नाटकातील भीमगड अभयारण्य, गोव्यातील भगवान महावीर अभयारण्य, महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या वन्यजीव मार्गाचा भाग आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास सुरक्षित ठेवणे आणि शिकार व तस्करी रोखणे महत्त्वाचे ठरत आहे.
वन्यप्राण्यांची शिकार आणि त्यांच्या अवयवांची तस्करी रोखण्यासाठी सावंतवाडी वनविभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वन्यजीव तस्करीसंदर्भात कोणाकडेही माहिती असल्यास ती वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी केले आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आणि अतिरिक्त कार्यभार असलेले उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वैभव भिसे, वनपाल संजय हजारे, सूर्यकांत सावंत, गौरेश राणे, वनरक्षक अतुल खोत, ब्रह्मकुमार भोजने, अनिकेत माने, समीर खरवत, प्रवीण कमळकर आणि वाहनचालक राहुल मयेकर यांनी सहभाग घेतला.



