सातार्डा चेकपोस्टवर ४२.९८ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त; आंध्र प्रदेशच्या आयशर कँटरवर कारवाई

पुठ्ठ्यांच्या आडून दारूची वाहतूक; ५९७ बॉक्स जप्त, २० लाखांचा कँटरही पोलिसांच्या ताब्यात

सावंतवाडी दि.०३: गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या आंध्र प्रदेशातील आयशर कँटरवर सातार्डा पोलीस चेकपोस्ट येथे पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला सुमारे २० लाख रुपये किमतीचा आयशर कँटरही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कँटरमधून पुठ्ठ्यांच्या आडून दारूचे ५९७ बॉक्स आंध्र प्रदेशात नेण्यात येत होते. याप्रकरणी प्रदीप भास्कर रामाराव आणि व्यंकट नागराज बालम, दोघेही रा. वेलूर, आंध्र प्रदेश, यांच्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातार्डा पोलीस दूरक्षेत्र आणि चेकपोस्ट येथे मंगळवारी वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी गोव्याहून दारू घेऊन आलेला आयशर कँटर सावंतवाडीच्या दिशेने जाण्यासाठी चेकपोस्टवर आला. या वाहनाबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कँटरची तपासणी केली. बाहेरून पाहता कँटरमध्ये पुठ्ठे भरलेले असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी पुठ्ठे बाजूला करून आत तपासणी केली असता, त्यामागे गोवा बनावटीच्या दारूचे मोठ्या प्रमाणात बॉक्स लपवून ठेवल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तातडीने सातार्डा पोलीस चेकपोस्ट येथे धाव घेतली. पोलिसांनी संबंधित कँटर ताब्यात घेऊन तो सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास कँटरमधील माल बाहेर काढून त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ५९७ बॉक्स आढळून आले. या दारूची किंमत ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या आयशर कँटरची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. अशा प्रकारे दारू आणि वाहन असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी प्रदीप भास्कर रामाराव आणि व्यंकट नागराज बालम या दोघांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दारू आंध्र प्रदेश राज्यात नेमकी कुठे आणि कोणासाठी वाहून नेण्यात येत होती, तसेच या बेकायदा वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलीस कर्मचारी सुरेश धोत्रे, नागनाथ टक्केकर, निलेश नाईक, बर्गे आणि गवस यांच्या पथकाने केली. सातार्डा चेकपोस्टवर झालेल्या या कारवाईमुळे गोवा बनावटीच्या दारूची आंतरराज्यीय बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासणीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here