सिंधुदुर्ग दि.०१: कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लावलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “१० खोके एकदम ओक्के” असा थेट आणि बोचरा मजकूर असलेले बॅनर्स झळकवत मनसेने सत्ताधारी गटावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे.
विशेष म्हणजे, कालच नेरूर येथील सरपंच व उपसरपंचांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या राजकीय घडामोडीनंतर अवघ्या काही तासांतच मनसेने मैदानात उतरत “विकास महत्त्वाचा आहे” अशी टॅगलाईन देत सरपंच-उपसरपंच असं लिहीलेल्या दोन खुर्च्यांचे प्रतीकात्मक फोटो असलेले बॅनर्स लावले आहेत. त्या खाली ठळक अक्षरांत “१० खोके एकदम ओक्के” असा उल्लेख करण्यात आला आहे.
नेरूरमधील तीन ते चार प्रमुख ठिकाणी हे बॅनर्स झळकले असून, त्यामुळे गावासह संपूर्ण तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या बॅनर्समधून नेमका कोणता संदेश दिला जात आहे, यावर विविध तर्कवितर्क लढवले जात असून, सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर मनसेने केलेली ही खेळी महत्त्वाची मानली जात आहे.दरम्यान, या प्रकरणावर संबंधित राजकीय पक्षांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी नेरूरच्या राजकारणात मात्र वातावरण चांगलेच तापले आहे.