कणकवली उड्डाणपुलावर टायर फुटल्याने कार पलटी

महामार्गावर पलटी झालेली कार

पाच पर्यटक सुदैवाने बचावले

कणकवली दि.०१: मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली उड्डाणपुलावर आज रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. धावत्या कारचा टायर अचानक फुटल्याने कार अनियंत्रित होऊन पलटी झाली. या अपघातात कारमधील पाचही प्रवासी सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याला सहलीसाठी आलेले पर्यटक आपल्या कारने मुंबईच्या दिशेने परतत होते. दुपारी सव्वा अकराच्या सुमारास त्यांची कार कणकवली उड्डाणपुलावरील ‘पल्लवी लॉज’च्या समोर आली असता, अचानक कारचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार जोरात संरक्षक कठड्याला (बॅरिकेड्स) धडकून महामार्गावरच पलटी झाली.

एअरबॅगमुळे वाचले प्राण
हा अपघात इतका भीषण होता की कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने अपघाताच्या वेळी कारमधील दोन्ही एअरबॅग वेळेत उघडल्या गेल्या. यामुळे कारमधील पाचही प्रवाशांना मोठी दुखापत झाली नाही आणि त्यांचे प्राण वाचले.

पोलिसांकडून तातडीची मदत
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, महामार्ग वाहतूक पोलीस हर्षल खडपकर, योगेश लाड, आणि दत्तात्रय राऊत यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. अपघातग्रस्त कार बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here