जमिनीच्या वादातून ओवळीयेत रक्ताचा सडा; कोयत्याच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, पिता-पुत्राला अटक

सावंतवाडी दि.२९: तालुक्यातील ओवळीये-मधलीवाडी येथे रविवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून एक भीषण हत्याकांड घडले. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याने ६५ वर्षीय सरस्वती सावंत यांचा कोयत्याच्या वारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (६१) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (३७) यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.
घटनेचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सरस्वती सावंत या आपला मुलगा एकनाथ सावंत याच्यासह घराशेजारील शेतात काम करत होत्या. यावेळी शेजारी राहणारे विजय सावंत आणि त्यांचा मुलगा रघुनाथ तिथे आले. “आमच्या जमिनीत काय करता?” या प्रश्नावरून दोन्ही गटांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयित पिता-पुत्राने सोबत आणलेल्या कोयत्याने सरस्वती यांच्या डोक्यावर भीषण वार केले.
उपचारापूर्वीच मृत्यू
हल्ल्यानंतर सरस्वती सावंत रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. मुलगा एकनाथ याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत जखमी सरस्वती यांना १०८ रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृत सरस्वती सावंत यांनी अवघ्या दोन दिवसांपूर्वीच संशयित विजय आणि रघुनाथ सावंत यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. ही तक्रार देऊनही पोलिसांनी ठोस प्रतिबंधात्मक पावले का उचलली नाहीत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
तपासाची चक्रे वेगवान
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी ओवळीये गावातून दोन्ही संशयितांना अटक केली आहे. एकनाथ सावंत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. ओवळीये परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here