अजितदादांच्या निधनामुळे महायुतीवर शोककळा; मुख्यमंत्र्यांची कणकवलीतील सभा रद्द.​

सिंधुदुर्ग दि.२८:राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर, आज कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारी महायुतीची जाहीर प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे.​आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. कणकवली येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार होते, मात्र अजितदादांच्या निधनामुळे सर्वच राजकीय कार्यक्रम तातडीने स्थगित करण्यात आले आहेत.​मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी ही सभा रद्द झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर मोठी शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला गमावल्याच्या भावनेने महायुतीचे सर्वच घटक पक्ष आणि कार्यकर्ते दुःखात बुडाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here