सावंतवाडी दि २८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
येथील भाजप शहर कार्यालयात आयोजित विशेष शोकसभेत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना भाजप नेत्यांनी अजित पवार यांच्या प्रशासकीय पकडीचा आणि विकासकामांच्या धडाक्याचा गौरव केला. “एक कणखर नेतृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आज राज्याने गमावले आहे,” असे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
या श्रद्धांजली सभेला प्रभारी नगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर,लखमराजे भोसले (उपाध्यक्ष, भाजप प्रदेश युवा मोर्चा)सुधीर आडीवरेकर (शहर अध्यक्ष व नगरसेवक)नगरसेवक: आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर.अॅड सिद्धार्थ भांबुरे,नगरसेविका: मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, निलम नाईक.तसेच दिलीप भालेकर व अन्य भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.


