सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांची व्याकुळ भावना
सावंतवाडी दि.२८:“राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे केवळ आमचे नेते नव्हते, तर तो आम्हा कार्यकर्त्यांचा मोठा आधार होते. त्यांच्या जाण्याने आज घरातील माणूस गेल्याची भावना आमच्या मनात आहे,” अशा शब्दांत सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी आपल्या अतीव संवेदना व्यक्त केल्या.
विमान अपघाताच्या कथित वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, दादांच्या आठवणींना उजाळा देताना कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले आहेत.
अजितदादांच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिस्तीचे आणि कार्यकर्त्यांवरील प्रेमाचे दाखले दिले. “काही दिवसांपूर्वीच आम्ही दादांना भेटायला गेलो होतो. सकाळी साडेपाच-सहा वाजता हा नेता बंगल्यावर हजर राहून कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकत होता. गवस साहेब आणि मी जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत तातडीने कामाचे आदेश दिले होते. असा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत रात्रंदिवस राबणारा नेता पुन्हा होणे कठीण आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
अजितदादांनी एकदा ‘हो’ म्हटले की ते काम झालेच पाहिजे, हा त्यांचा शब्द प्रशासनासाठी आदेश असायचा. “दादांकडे पाहिल्यावर आम्हाला पक्षात सुरक्षित वाटायचे. सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात आम्ही जो जोमाने काम करतोय, तो केवळ दादांनी दिलेल्या उभारीमुळेच,” असेही कार्यकर्त्यांनी नमूद केले.
या कठीण प्रसंगी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जनता पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. नियतीने घातलेला हा घाला अत्यंत क्लेशदायक असून, दादांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.


