तिरोडा पंचक्रोशीत बीएसएनएलची ‘४जी’ सेवा अखेर कार्यान्वित

सागर नाणोसकर यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश

सावंतवाडी दि.२८: सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा आणि नाणोस पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आंदोलनाच्या पवित्र्यानंतर तिरोडा येथील बीएसएनएलचा ४जी टॉवर सुरू करण्यात आला असून, यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

तिरोडा गावात सुमारे पाच वर्षांपूर्वी बीएसएनएलचा टॉवर मंजूर झाला होता. अनेक प्रयत्नांनंतर १० महिन्यांपूर्वी टॉवरची उभारणी पूर्ण झाली, परंतु तांत्रिक कारणांमुळे तो बंद अवस्थेत होता. यामुळे तिरोडा, नाणोस आणि परिसरातील गावांमधील नागरिकांना मोबाईल नेटवर्कसाठी मोठी कसरत करावी लागत होती.

नेटवर्कच्या या समस्येबाबत ग्रामस्थांनी वारंवार बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, लेखी पत्रव्यवहार केला. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासन आणि दिरंगाई मिळत होती. अखेर नाणोस ग्रामपंचायत सदस्य सागर सोमकांत नाणोसकर यांनी आक्रमक भूमिका घेत, “येत्या आठ दिवसांत टॉवर सुरू न झाल्यास २६ जानेवारी रोजी टॉवरवर चढून आंदोलन करू,” असा इशारा दिला होता.

या इशाऱ्याची दखल घेत बीएसएनएल प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या. २६ जानेवारीपूर्वीच या टॉवरची ४जी सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली. नेटवर्क सुरू झाल्यामुळे आता तिरोडा आणि नाणोस गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबणार असून ऑनलाइन कामांना गती मिळणार आहे. या यशाबद्दल सागर नाणोसकर यांच्यासह पाठपुरावा करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे परिसरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here