विक्रांत सावंतांचा विजय निश्चित!” 🚩

 

माजगाव येथे भाजप उमेदवार विक्रांत सावंत यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब सोबत विक्रांत सावंत, अशोक दळवी, रेश्मा सावंत,गुणाजी गावडे आदी

जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला ठाम विश्वास: नम्र स्वभाव आणि विकासकामे हीच त्यांच्या विजयाची शिदोरी ठरेल!

सावंतवाडी दि.२९: “विक्रांत सावंत यांच्यातील नम्रपणा आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ त्यांना या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करेल. ज्याप्रमाणे भाई सावंत आणि विकास सावंत यांनी जनसेवेची परंपरा जपली, तीच परंपरा विक्रांत समर्थपणे पुढे नेत आहेत. येथील अफाट जनसागर पाहता विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार असून विक्रांत सावंत विक्रमी मताधिक्याने निवडून येतील,” असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला.

माजगाव येथे आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उमेदवार विक्रांत सावंत, उत्कर्षा गावकर, सचिन बिर्जे यांच्यासह अनेक सरपंच आणि मान्यवर उपस्थित होते.

दोन पिढ्यांच्या विकासकामांची पावती मिळणार
संजू परब यांनी आपल्या भाषणात सावंत कुटुंबाच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “माजगावमध्ये ९९ टक्के मते मिळतील असे काम भाई सावंत यांच्या दोन पिढ्यांनी केले आहे. विकास भाईंनी या भागाचा कायापालट केला आणि त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवले. आज विक्रांत सावंत देखील त्याच आदराने आणि नम्रतेने लोकांमध्ये मिसळत आहेत. राजकारणात असा स्वभाव दुर्मिळ असून, हाच गुण त्यांना विजयाकडे खेचून नेईल.”या प्रचार सभेला सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, चराठा सरपंच प्रचिती कुबल, माजी सभापती गौरी पावसकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह प्रशांत बुराने, भरत गावकर, राजू कुबल, राजन सरमळे, संजय गावडे, विशाखा जाधव, गीता कासार, मधु कुंभार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधकांवर साधला निशाणा
सभेतील गर्दीचा संदर्भ देत परब यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “जितके बोलतो तितके काम करतो, हा आमचा बाणा आहे. ज्याप्रमाणे माझा जिल्ह्यामध्ये मोठ्या मताधिक्याने विजय झाला, तसाच विजय विक्रांतचा देखील होईल. समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल इतका उत्साह मतदारांमध्ये दिसत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

माजगाव येथील जाहिर प्रचारसभेत बोलताना भाजप उमेदवार विक्रांत सावंत व अन्य.

“आता तुम्हीच आमचे माय-बाप!”; विक्रांत सावंतांची माजगावमध्ये भावनिक साद
विरोधकांचे वाल्मिकी केले, पण आता विकासासाठी साथ द्या;

“गेल्या ३७ वर्षांत मी नेहमी इतरांसाठी भाषणे केली, पण आज आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःसाठी उभा आहे. मी माझी आई, वडील आणि पत्नी गमावली आहे, आता तुम्हीच आमचे माय-बाप आहात,” अशा शब्दांत माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रांत विकासभाई सावंत यांनी मतदारांना भावनिक साद घातली. माजगाव येथे आयोजित भव्य प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि रिपाई या चारही घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकारणाचे बाळकडू जन्मापासूनच
आपल्या भाषणात विक्रांत सावंत म्हणाले की, “माझा जन्म झाला तेव्हा माझे आजोबा भाईसाहेब सावंत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू मला आईच्या गर्भातच मिळाले आहे. गेल्या पाऊणे चाळीस वर्षांपासून मी राजकारण जवळून पाहत आलो आहे. भाईसाहेब आणि विकासभाईंनी जो पारदर्शक व्यवहाराचा वारसा जपला, त्याच वाटेने मी काम करणार आहे.”

नारायण राणे आणि रवींद्र चव्हाणांचे पाठबळ
“बाहेरून कुणीही काहीही अफवा पसरवल्या तरी, माझ्या पाठीशी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची ताकद आहे. तसेच माझ्या सर्व भगिनींचे आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती आहे. ज्याप्रमाणे शिवरायांना मावळ्यांची साथ मिळाली, तशीच साथ मला इथल्या जनतेकडून मिळत आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्यांचे ‘वाल्मिकी’ केले त्यांनीच फायदा घेतला
विक्रांत सावंत यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले की, “आम्ही अनेकांना मोठे केले, अनेकांचा फायदा करून दिला. ज्यांचा ‘वाल्या’ होता त्यांचा आम्ही ‘वाल्मिकी’ केला, त्यांनीही आमचा फायदा घेतला. पण मी नेहमी दुसऱ्यांसाठी जगणारा माणूस आहे. आज माझ्यासमोर कोणी उभा असेल तर ते त्याचं दुर्दैव आहे, माझे नाही. कारण माजगावची जनता विकासकामांना ओळखते.”

विकासासाठी महायुतीला निवडून द्या
जवळपास चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यावेळी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा, जे सरकार केंद्रात आणि राज्यात काम करत आहे, त्याच विचारांचे लोक जिल्हा परिषदेत पाठवा, जेणेकरून माजगावमध्ये विकासाची गंगा अखंड वाहत राहील. विकास भाईंनी ६० वर्षे ज्ञानदानाचे जे पवित्र कार्य केले, तोच वारसा पुढे नेण्यासाठी तिन्ही उमेदवारांना (विक्रांत सावंत, उत्कर्षा गावकर, सचिन बिर्जे) विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here