35.7 C
New York
Saturday, July 4, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 14

पक्षातील कुरघोडींना कंटाळून मोहिनी मडगावकर यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा! भाजपमध्ये खळबळ: “तो सूत्रधार कोलगावचा”, पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप…

सावंतवाडी दि. ०६: येथील पालिकेच्या माजी नगरसेविका तथा भाजपच्या शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने स्थानिक भाजप वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने अंतर्गत कुरघोडी केली जात असून, पक्ष बैठकीत आपला अपमान करण्यात आल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. आज आयोजित एका जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना मडगावकर यांनी पक्षांतर्गत राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट बॉम्बगोळा टाकला.

“तो सूत्रधार कोलगावचा; महिला जिल्हाध्यक्षा त्यांना का घाबरतात?”
पत्रकार परिषदेत बोलताना मोहिनी मडगावकर यांनी पक्षातील काही व्यक्तींवर थेट निशाणा साधला. विशेषतः कोलगावातील एका पदाधिकाऱ्यामुळे आपल्यावर मोठा अन्याय होत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. “तो सूत्रधार कोलगावचा आहे,” असा उल्लेख करत मडगावकर यांनी खळबळ उडवून दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “पक्ष संघटनेत काम करत असताना सहकार्याऐवजी वारंवार अडथळे निर्माण केले जात आहेत. या संपूर्ण प्रकाराबाबत आणि संबंधित पदाधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत मी भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्यासमोरही माझी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, महिला जिल्हाध्यक्षा तरी त्यांना एवढ्या का घाबरतात?” असा रोकडा सवालही मडगावकर यांनी यावेळी उपस्थित केला.

बाहेरच्या मंडळींची शहरात ढवळाढवळ!
पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मडगावकर म्हणाल्या की, “माझा शहराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच मला पद सोडण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारणी न बदलता केवळ सावंतवाडीतच अशी ढवळाढवळ का केली जात आहे? जिल्ह्याचे सरचिटणीस इतरत्र कुठेही न जाता फक्त सावंतवाडीतच वारंवार बैठका का घेतात? बाहेरची मंडळी शहरात येऊन नाहक ढवळाढवळ करत आहेत.” पक्षात महिला पदाधिकाऱ्याला सन्मानाची वागणूक मिळत नसल्यामुळेच अखेर आपण शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आपल्या या निर्णयानंतर शहरातील कार्यकारणीतील इतर पदाधिकारी देखील आपल्या पदाचा राजीनामा देतील, असा इशाराही त्यांनी दिला.

नेत्यांवर विश्वास, नगरसेवक म्हणून काम सुरूच राहणार!
“मी आज राजीनामा देत असून पुन्हा कोणत्याही परिस्थितीत हे पद स्वीकारणार नाही. आज मी अत्यंत स्वाभिमानाने आणि सन्मानाने या पदावरून बाजूला होत आहे,” असे मडगावकर यांनी ठामपणे सांगितले. मात्र, आपला भाजप पक्षावर जीव आहे आणि पक्षावरील प्रेम कायम राहील, असे स्पष्ट करत त्या म्हणाल्या, “देशाचे नेते नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हेच आमचे नेते असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही यापुढेही पक्षात काम करत राहू. शहराध्यक्ष पद सोडले असले तरी नगरसेवक म्हणून मी लोकांची कामे करत राहीन आणि पक्षाची एक निष्ठावंत सदस्य म्हणून पक्षाचे काम करत राहीन.”

दरम्यान, मोहिनी मडगावकर यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामुळे आणि पत्रकार परिषदेतील थेट आरोपांमुळे सावंतवाडी भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजीनामा सत्राचे तालुक्यात आणि जिल्ह्यात काय राजकीय पडसाद उमटतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 महावितरणचा मनमानी कारभार! भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सासुरवाडीलाही विजेचा तीव्र फटका; सावंतवाडीतील १५-१६ गावांची कोंडी! 🚨

🚨 🚨सावंतवाडी दि.०६: सावंतवाडी तालुक्यातील वीज पुरवठ्याचा प्रश्न आता राजकीयदृष्ट्या कमालीचा तापला असून, यामध्ये आता ‘नेमळे’ गाव केंद्रस्थानी आले आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांचे हे सासुरवाडीचे गाव, तर सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक हेही याच गावचे सुपुत्र! असे असूनही हे गाव विजेसाठी आजही वेंगुर्ला तालुक्याशी जोडलेले असल्याने ग्रामस्थांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. गाव सावंतवाडीत आणि वीज पुरवठा वेंगुर्ल्यातून, अशा विचित्र प्रशासकीय व्यवस्थेमुळे नेमळे, आजगाव, भोमवाडी, मळेवाड, कोंडुरे, सातार्डा, सातोसे, आरोस, पाडलोस अशा १५ ते १६ गावांची पुरती कोंडी झाली आहे.
याविरोधात ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी मळेवाड येथील गणपती मंदिरात महावितरणच्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी देण्यासाठी भजन करत उपरोधिक आंदोलनही छेडले होते, मात्र तरीही महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांना अद्याप जाग आलेली नाही.
💸 १५-१६ गावांना वेंगुर्ल्याचा नाहक भुर्दंड आणि दुहेरी फटका!
भौगोलिकदृष्ट्या ही गावे सावंतवाडीत असूनही वीज तक्रारींसाठी ग्राहकांना मुद्दाम वेंगुर्ला मुख्यालय किंवा रेडी येथील कार्यालयात जावे लागते. महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना या प्रवासासाठी नाहक वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. ही गावे तातडीने सावंतवाडी वीज कार्यालयाला जोडावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
📉 कमी दाबाचा पुरवठा; विद्युत उपकरणे निकामी!
सातार्डा, साटेली, मळेवाड, कोंडुरा भागात दर अर्ध्या-एक तासाने वीज गायब होणे ही ‘परंपराच’ बनली आहे. काल शुक्रवार (५ जून) रोजी रात्री तर तास-तासभर वीज खंडित होत होती. त्यातच अत्यंत कमी दाबाने (लो व्होल्टेज) वीज पुरवली जात असल्याने सततच्या ‘फ्लक्चुएशन’मुळे नागरिकांची महागडी विद्युत उपकरणे निकामी होत आहेत. कडक उन्हाळ्याच्या उकाड्याने ग्रामीण जनता हैराण झाली असताना, वायरमन मात्र “१५ मिनिटांत वीज येईल” अशी खोटी आश्वासने देऊन नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.
📌 सावंतवाडी पंचायत समितीत वेंगुर्ला महावितरणचे अभियंता का नाहीत?
पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा अशा सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहून लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे देतात. सावंतवाडी वीज महावितरणचे अधिकारीही या बैठकीला येतात. मात्र, सावंतवाडी तालुक्यातीलच १५ ते १६ गावे जोडलेल्या वेंगुर्ला वीज महावितरणच्या उपअभियंत्यांना या बैठकीचे निमंत्रण का दिले जात नाही? त्यांनाही या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत रितसर पत्रव्यवहार करून उपकृत करण्याची गरज आता व्यक्त होत आहे.
वादळ नसतानाही वीज गुल; महावितरणचे स्पष्टीकरण शून्य!
सध्या परिसरात किरकोळ अवकाळी पाऊस सुरू असला, तरी कोणत्याही वादळी वाऱ्याचा प्रादुर्भाव नसतानाही महावितरणकडून वीज पुरवठा तासनतास खंडित केला जातो. यावर महावितरण कंपनीकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिले जात नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.
आमदार रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कोणताही प्रश्न चुटकीसरशी सोडवण्याची राजकीय क्षमता असताना, महावितरणच्या या जाचक त्रासातून हक्काच्या मतदारांची मुक्तता का केली जात नाही? असा रोकडा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

📱 सिंधुदुर्ग जिल्हा होणार अधिक हिरवागार आणि प्लास्टिकमुक्त! 🌱✨

सावंतवाडी दि.०५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडीच्या वनविभागाने उचलले मोठे पाऊल! पुढील १५ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात तब्बल ५,००० वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची घोषणा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी केली आहे.

🌳 यंदाच्या वृक्षलागवडीचे वैशिष्ट्य:औषधी गुणधर्म असलेले ३,५०० ‘नरक्या’ वृक्ष.पर्यावरणपूरक १,५०० वटवृक्ष (वड).

🚮 ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ संकल्पना:
नरेंद्र डोंगरावरील प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वनविभाग आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत तब्बल ५० गोणी कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. “सावंतवाडीसह संपूर्ण जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्वांनी कचराकुंडीचा वापर करावा,” असे आवाहन मिलिश शर्मा यांनी केले आहे.

🗣️ “झाडे आपली ‘आजी-आजोबा’ आहेत!”
कार्यक्रमात बोलताना पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर म्हणाले, “नवीन झाडे लावण्यासोबतच पिढ्यानपिढ्या वाढलेली जुनी झाडे आपली ‘आजी-आजोबा’ समजून जपली पाहिजेत.”

या मोहिमेत जिल्ह्यातील वनअधिकारी, पत्रकार बांधव आणि मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

चंद्रपूर विधान परिषद निवडणूक: काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांची नाट्यमय माघार; पक्षातून हकालपट्टी, भाजपचे अरुण लखानी अविरोध विजयी

चंद्रपूर दि.०५ : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी समोर आल्या आहेत. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी पक्ष नेतृत्वाला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक आपली उमेदवारी मागे घेतली. या धक्कादायक निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने (MPCC) अग्रवाल यांच्यावर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली आहे. त्यांचे पक्ष सदस्यत्व तातडीने रद्द करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून माघार; काँग्रेसची कठोर कारवाई
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, शैलेश अग्रवाल यांच्या स्वतःच्या विनंतीवरूनच पक्षाने त्यांना या निवडणुकीत अधिकृत उमेदवारी (एबी फॉर्म) दिली होती. महायुतीविरोधात तगडे आव्हान उभे करण्यासाठी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.

परंतु, नामांकन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी पक्षाच्या कोणत्याही स्थानिक किंवा राज्य पातळीवरील नेत्याला विश्वासात न घेता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतला. त्यांच्या या अनपेक्षित आणि शिस्तबाह्य कृतीमुळे पक्षाची मोठी राजकीय कोंडी झाली असून ही बाब अत्यंत गंभीर आणि चुकीची मानत काँग्रेसने त्यांचे थेट सदस्यत्वच रद्द केले.

शैलेश अग्रवाल यांचे गंभीर आरोप
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शैलेश अग्रवाल यांनी एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी सांगितले की, “निवडणुकीत विजयासाठी आवश्यक असणारे संख्याबळ आमच्याकडे अपुरे होते. एवढेच नव्हे तर, काही काँग्रेस नेतेच थेट भाजपशी संगनमत करून मतदारांमध्ये पैशांचे वाटप करत होते.” स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने आणि निवडणुकीतील पैशांच्या वाढत्या वापरामुळे आपण हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या थेट आरोपांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

महायुतीचे अरुण लखानी अविरोध विजयी
या निवडणुकीत काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्या माघारीनंतर अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनीही आपला अर्ज मागे घेतला. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी अचानक माघार घेतल्यामुळे निवडणुकीतील सर्वच चित्र पालटले. परिणामी, महायुतीचे (भाजप) अधिकृत उमेदवार अरुण लखानी यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. भाजपची ही व्यूहरचना यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसच्या अडचणीत वाढ
अग्रवाल यांच्या या बंडखोर पवित्र्यामुळे आणि त्यानंतर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्याने काँग्रेसच्या स्थानिक तसेच राज्य नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर महत्त्वपूर्ण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस समोरील अंतर्गत आव्हानं आणि संघटनात्मक स्थिती यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी शहराच्या विकासासाठी आमदार प्रमोद जठार कटिबद्ध; सर्वतोपरी सहकार्य व निधी देण्याचे आश्वासन

सावंतवाडी दि.०५: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, आज त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.

नगरपालिकेत आगमन झाले असता, नगराध्यक्षा श्रद्धा राजे सावंत भोसले यांनी आमदार प्रमोद जठार यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.

“सावंतवाडीच्या प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही”
शहरातील विविध विकासकामांची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर आमदार जठार यांनी पालिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जाहीर केले. “सावंतवाडी शहराच्या प्रगतीसाठी आणि येथील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी लागणारा आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल. शहराच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून, येथील स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देऊन ते मार्गी लावले जातील,” अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला आणि भेटी दरम्यान राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:

प्रमोद कामत (अध्यक्ष, जिल्हा परिषद)
प्रभाकर सावंत (जिल्हाध्यक्ष, भाजपा)
श्रद्धाताई भोसले (नगराध्यक्षा)
श्वेताताई कोरगावकर (अध्यक्ष, महिला मोर्चा)
सुधीर आरिवडेकर (मंडल अध्यक्ष व आरोग्य सभापती)
अॅड अनिल निरवडेकर (उपनगराध्यक्ष)
रणजीत देसाई (नगरसेवक/पदाधिकारी)
आनंद नेवगी (नियोजन सभापती)
प्रतीक बांदेकर (पाणीपुरवठा सभापती)
यांच्यासह नगरपालिकेचे इतर लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार जठार यांच्या या दौऱ्यामुळे आणि आश्वासनामुळे सावंतवाडीतील विकासकामांना आता अधिक गती मिळेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

आई-बाबांच्या आठवणींचा अखंड दीप

— हरिश्चंद्र चंद्रकांत पवार ( विजय )

आईच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्या मायेची सावली हरपल्याचे दुःख अजून मनात ताजे असतानाच पहाडासारखा पाठीशी उभा राहणारा बाबा अचानक निघून गेला आणि आयुष्यच पोरके झाले. आईचा समजूतदारपणा आणि बाबांचा कणखरपणा यामुळे आमचे आयुष्य फुलत होते. आई गेल्यानंतर मोठा आधार हरपला होता, पण बाबांच्या रूपाने आम्हाला अजूनही धीर होता. मात्र नियतीने तोही आधार हिरावून घेतला.
आई-बाबांची जोडी खरोखर अद्भुत होती. दोघेही एकत्र जात, कधी भांडत, तर दुसऱ्याच क्षणी पुन्हा एकमेकांत मिसळून जात. आई गेल्यानंतर बाबांची जगण्याची इच्छाच कमी झाली होती. जेवणावरची वासना उडाली होती. सतत तिच्याच आठवणीत ते हरवून जात. “आता तिच्याशिवाय माझे काय होणार?” हा प्रश्न त्यांना सतावत असे.
आम्ही भावंडे त्यांना समजावून सांगत होतो. आईला वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न झाले, पण दैवापुढे कुणाचे काही चालत नाही. आम्ही त्यांना सांगत असू, “आता तुम्हीच आमचे आई-बाबा आहात. तुम्ही खचू नका. सैन्यात सेवा करताना शत्रूच्या गोळ्यांना सामोरे गेलात, आता नशिबाशीही सामना करा.” पण आईच्या विरहाने त्यांचे मन तुटले होते. अखेर अवघ्या महिन्याभरात आईने जणू त्यांनाही आपल्या सोबत बोलावून घेतले. आता “विजय” अशी हाक कोण मारणार?
बाबा स्वभावाने रागीट होते, पण परिस्थितीने त्यांना तसे घडवले होते. एक सैनिक म्हणून त्यांनी कठोर शिस्त अंगीकारली होती. त्यांचे हृदय जरी कठोर वाटत असले, तरी मुलांबद्दलची माया अथांग होती. मनाला जे पटत नाही ते त्यांनी कधी स्वीकारले नाही. सैनिकी शिस्त, बोलण्यातला दरारा आणि देशसेवेचा अभिमान त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येत असे.
१९६५ आणि १९७१ च्या युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आम्ही लहान असताना त्यांनी जम्मू-काश्मीर आणि बिहारमधील गया येथे आम्हाला सोबत नेले होते. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फात खेळण्याचे दिवस आजही डोळ्यांसमोर उभे राहतात. परेड मैदानावरून येणारा “एक-दोन, एक-दोन” चा आवाज, सैनिकांच्या बुटांचा खडखडाट, आणि सैनिकी वातावरणातील शिस्त आजही स्मरणात आहे.
बाबा शक्तिमान गाडीतून आम्हाला फिरायला नेत असत. लंगरमध्ये नेऊन रोटी, डाळ, भाजी, टॉफी खाऊ घालत असत. अनेकदा कोंबड्या, अंडी आणि इतर सामान घेऊन येत असत. काश्मीरमधील बर्फ, मीठाचा चहा आणि आईची काळजी आजही मनात कोरलेली आहे. आम्ही तिची नजर चुकवून बर्फात खेळत असू आणि मग आजारी पडलो की तिची बोलणीही खावी लागत.
आईनंतर बाबा आमचे सर्वस्व होते. त्यांचे जाणे म्हणजे आमच्या कुटुंबावर आभाळ कोसळण्यासारखे होते. त्यांनी कधी कुणाकडे काही मागितले नाही. स्वाभिमानाने जगले. निवृत्ती वेतन, सैनिकी सुविधा आणि देशसेवेचा अभिमान हेच त्यांचे खरे वैभव होते.
प्रत्येक २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला ते सैनिकासारखेच सजून ध्वजारोहणाला जात असत. बुटांना पॉलिश, बेल्ट चमकवून आणि स्टार्च केलेला गणवेश परिधान करून ते अभिमानाने सहभागी होत. अनेकदा त्यांना ध्वजारोहणाचा मान मिळत असे आणि तो क्षण ते मोठ्या आनंदाने सांगत असत.
१९७१ च्या युद्धाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडीतील रॅलीत त्यांनी गणवेश परिधान करून सहभाग घेतला होता. त्यांच्यातील देशभक्ती आणि राष्ट्रसेवेचा अभिमान शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिला.
आमच्या घराण्यात देशसेवेची परंपरा आजोबांपासून चालत आलेली आहे. आजोबा मराठा बटालियनमध्ये होते. बाबा एएससीमध्ये सेवा बजावत होते. शांताराम आबा, बाबू काका आणि इतर नातेवाईकांनीही सैन्यदलात सेवा बजावली. आज त्यांपैकी बहुतेक जण या जगात नाहीत. मात्र त्यांची देशसेवा, त्याग आणि शिस्तीची परंपरा आमच्या मनात कायम जिवंत आहे.
आई, तू गेलीस आणि जाताना बाबांनाही सोबत घेऊन गेलीस. आम्ही कुणाच्या आधारावर जगायचे गं? बाबा, तुमचे जाणे आम्हाला पोरके करून गेले. तुमच्या आणि आईच्या आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील. तुमचे जीवन, तुमचा त्याग, तुमची देशभक्ती आणि तुमचे संस्कार आमच्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील.

तुमची आठवण प्रत्येक क्षणी येते आणि येत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली!

/——–/——-/——/——-/*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-*अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*

*वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी*

संपर्क :9422054887,8275659563

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, आंबडपालच्या कार्यकारी अभियंतापदी श्री. संदीपकुमार महाले

संदीपकुमार हिरामण महाले

सावंतवाडी दि.०३: सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल, कुडाळ या कार्यालयाच्या कार्यकारी अभियंतापदी श्री. संदीपकुमार हिरामण महाले हे मंगळवार दिनांक २ जून रोजी हजर झाले असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. कार्यकारी अभियंता श्री. गोविंद श्रीमंगले यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
यापूर्वी श्री. संदीपकुमार महाले हे
कार्यकारी अभियंता व पदसिद्ध अवर सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय येथे कार्यरत होते.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पावर सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणुन त्यांनी काम केलेले आहे. त्यानंतर पदोन्नतीने ते कार्यकारी अभियंता म्हणून मंत्रालयात कार्यरत होते.
मंगळवारी श्री. महाले यांनी कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. महेंद्र डांबरेकर,उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री. आकाश जाधव, सहायक अभियंता श्रेणी १, पाटबंधारे उपविभाग कणकवली, श्री प्रसाद कापडोसकर आरेखक, महेंद्र मस्के, प्रथम लिपिक, राजू डाके, लिपिक टंकलेखक, उमेश रांजणकर सहा. अभियंता श्रेणी 2,
शैलेश परब, कनिष्ठ अभियंता, संदीप यादव, लिपिक, अमृत देसाई. लिपिक महेश आंदूरलेकर, कनिष्ठ अभियंता, सुनील सुपल लिपिक, आकाश चौरपगार, सहा. भांडारपाल व कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

सावंतवाडी पर्यटन सुविधा केंद्रावर चोरीचा प्रयत्न; दोन संशयित पोलिसांच्या जाळ्यात

सावंतवाडी दि.०२: गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या सावंतवाडी येथील पर्यटन सुविधा केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या केंद्रातील महागड्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न करत असताना सावंतवाडी पोलिसांनी आज पहाटे दोन तरुणांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत असले तरी, कोट्यवधींच्या या वास्तूची होत असलेली दुरवस्था पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

बुधवारी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास ‘तीन मूशी’ परिसरात पोलीस हवालदार कोरगावकर आणि कर्मचारी सुरेश पाटील गस्तीवर असताना त्यांना एक वाहन संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात एक महागडा ‘एसी कॉम्प्रेसर’ आढळून आला. या मालाबाबत विचारणा केली असता, वाहनातील उमेश नाईक (३१, रा. माणगाव कालेली) आणि सोहम पिळणकर (१९, रा. सालईवाडा, सावंतवाडी) यांना कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. अखेर, हा माल पर्यटन सुविधा केंद्रातून चोरल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

एकेकाळी हॉटेल व्यवसायासाठी भाड्याने दिलेली ही वास्तू कराराची मुदत संपल्यापासून दुर्लक्षित आहे. सध्या या केंद्राला मोकाट गुरांच्या अड्ड्याचे स्वरूप आले असून, आता चोरांनीही आपला मोर्चा तिथे वळवल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही शासकीय मालमत्ता वाचवण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. पोलीस हवालदार सुरेश पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

शिरोडा-वेळागर समुद्रात गडहिंग्लजचा एक पर्यटक बुडाला; एकाचा जीव वाचला

वेंगुर्ले दि.०२ : शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ले) येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला गडहिंग्लज येथील २१ वर्षीय युवक खोल पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना आज (२ जून) सायंकाळी घडली. प्रणव देवमाने असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेला दुसरा मित्र सुदैवाने पोहून बाहेर आल्याने बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज येथून पर्यटकांचा एक गट शिरोडा परिसरात फिरण्यासाठी आला होता. सायंकाळच्या सुमारास प्रणव आणि त्याचा मित्र समुद्रात आंघोळीसाठी उतरले. मात्र, समुद्राच्या लाटांचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले.

बचाव: एका पर्यटकाने शर्थीचे प्रयत्न करत लाटांशी झुंज दिली आणि सुखरूप किनारा गाठला.बेपत्ता: प्रणव देवमाने हा पाण्याचा प्रवाहाबरोबर खेचला गेल्याने खोल पाण्यात बेपत्ता झाला.

प्रशासनाची शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच शिरोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मच्छिमार आणि जीवरक्षकांच्या मदतीने समुद्रात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, उशिरापर्यंत प्रणवचा शोध लागलेला नव्हता.

शिरोडा किनारपट्टीवर भीतीचे वातावरण
गेल्या आठवडाभरातील ही दुसरी मोठी दुर्घटना असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग यांचा होडी उलटून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा पर्यटकाचा बुडून अपघात झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रशासनाचे आवाहन: पावसाळ्याचे वेध लागले असताना समुद्राला उधाण येण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रात उतरताना गाफील न राहता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी पालिकेचा अनोखा उपक्रम; क्रश मशीनमध्ये प्लास्टिक बॉटल टाका आणि ‘चॉकलेट’ मिळवा!

सावंतवाडी दि.०२: शहराच्या स्वच्छतेसाठी आणि प्लास्टिक मुक्तीसाठी सावंतवाडी नगरपालिकेने एक अतिशय कौतुकास्पद आणि अनोखे पाऊल उचलले आहे. शहरात बसवण्यात आलेल्या ‘बॉटल क्रश मशीन’मध्ये प्लास्टिकची रिकामी बॉटल टाकणाऱ्या नागरिकांना आता चक्क एक चॉकलेट गिफ्ट म्हणून मिळणार आहे. शहराला ‘कुठेही प्लास्टिक न फेकणारे शहर’ बनवण्यासाठी पालिकेने ही पर्यावरणपूरक मोहीम हाती घेतली असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सावंतवाडी नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत हा विशेष प्रकल्प राबवला आहे. याबाबतची सविस्तर माहिती नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी दिली.

शहरात दोन ठिकाणी ‘बॉटल क्रश मशीन’
सावंतवाडी शहरात सध्या अशा प्रकारच्या २ बॉटल क्रश मशीन बसवण्यात आल्या आहेत. नागरिक जेव्हा आपली वापरलेली प्लास्टिक बॉटल या मशीनमध्ये टाकतील, तेव्हा मशीनमधून त्यांना एक चॉकलेट मिळेल. यामुळे नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये प्लास्टिक कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची सवय रुजण्यास मदत होणार आहे.

अवघ्या ५ रुपयांत मिळणार कापडी पिशवी!
प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा यासाठी पालिकेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात ठिकठिकाणी कापडी पिशवी वेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहेत. या मशीनमध्ये नागरिकांनी केवळ ५ रुपयांचा कॉईन (नाणे) टाकल्यास, त्यांना कापडी पिशवी उपलब्ध होणार आहे. यामुळे बाजारात येताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर थांबेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

खर्चाचा अंदाज:
सावंतवाडी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिकेने जवळपास २० ते २५ लाख रुपये खर्च करून या बॉटल क्रश मशीन आणि कापडी पिशवी वेंडिंग मशीनची व्यवस्था केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी बसवणार डस्टबिन
सावंतवाडीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार झाला आहे. यासोबतच शहरात ठिकठिकाणी आधुनिक डस्टबिन (कचरापेट्या) बसवण्याचा निर्णयही पालिका प्रशासनाने घेतला आहे.

हा संपूर्ण प्रकल्प यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली.

प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अधिकारी वैभव अंधारी, आरोग्य निरीक्षक विनोद सावंत, दिलीप मापसेकर आणि गजानन परब या सर्वांच्या सहकार्याने सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन व मशीन बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालिकेच्या या ‘गोड’ उपक्रमामुळे सावंतवाडी शहर प्लास्टिकमुक्त होण्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563